मोकाट गायींचा लिलाव आयोजित करणार्या तुळजापूर
नगरपरिषद प्रशासनावर भाजप शासनाने कठोर कारवाई करावी, ही गोप्रेमींची अपेक्षा !
तुळजापूर – तुळजापूर नगरपरिषदेने ७ नोव्हेंबर म्हणजेच वसुबारसेच्या दिवशी मोकाट गायींचा लिलाव आयोजित केला होता. गोमातेला कसायांच्या स्वाधीन करण्याचा घाट येथील ‘जाणता राजा गोरक्षण बहुउद्देशीय संस्थे’ने जाणून त्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी हा लिलाव रहित करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे केली. त्यामुळे हा लिलाव प्रशासनाला रहित करावा लागला. (गायींचा जाहीर लिलाव रोखून गोरक्षणाचे कार्य करणार्या ‘जाणता राजा गोरक्षण बहुउद्देशीय संस्थे’चे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
तुळजापूरमध्ये मोकाट गायी चारा-पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात. त्या मोकाट गायी नगरपरिषद प्रशासनाकडून हुडको वसाहतीतील उद्यानामध्ये एकत्र करण्यात आल्या होत्या. ७ नोव्हेंबर या दिवशी त्या गायींचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला होता. जाणता राजा गोरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. अजय साळुंके यांनी याविषयी तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी मुख्याधिकार्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या भाविकांनी श्री भवानीमातेला नवस बोलून गायी सोडल्या आहेत, त्या गायींचे नियंत्रण गरजू शेतकरी किंवा एखाद्या गोरक्षण संस्थेस लेखी पत्र देऊन केल्यास त्यांचा सांभाळ होईल आणि गोमातेचे रक्षण होईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात