Menu Close

पुरोगामी पत्रकार विनोद दुआ यांनी हिंदु धर्मशास्त्रातील मंत्रांच्या शक्तीच्या संदर्भात केलेला अपप्रचार आणि त्याचे खंडण

श्री. रमेश शिंदे

चीन भारताच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करत असून आता तर त्याने भारताच्या सीमेवरच सैन्य आणून ठेवले आहे. यावर एक उपाय म्हणून रा.स्व. संघाचे नेते श्री. इंद्रेश कुमार यांनी चीनच्या विरोधात मंत्रशक्तीचा वापर करण्यासाठी भारतियांना एका मंत्राचे उच्चारण करण्याचे आवाहन केले. यावरून पोटशूळ उठलेले एनडीटीव्हीचे पुरोगामी पत्रकार विनोद दुआ यांनी जन गण मन की बात या कार्यक्रमात हिंदु धर्मशास्त्रातील मंत्रशक्तीची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ग्वालियर (ग्वाल्हेर) येथील आय.टी.एम्. विद्यापिठाचे उपकुलगुरु श्री. रमाशंकर सिंह यांचा (जे ना इतिहास संशोधक आहेत, ना अभ्यासक) संदर्भ देऊन सोमनाथ मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण केले, त्या वेळी मंदिराचे पुजारी लढण्याऐवजी वशीकरण आणि शत्रू-उच्चाटण मंत्रोच्चार करत बसल्याने मंदिराचा विध्वंस झाला अन् पुजारीही मारले गेले, असा चुकीचा इतिहास सांगितला आहे. या वेळी ते म्हणतात, हिंदुत्वनिष्ठ संघटना ज्याप्रमाणे पुष्पक विमानाविषयी, तसेच श्री गणेशाच्या धडाला हत्तीचे तोंड लावण्याची शस्त्रक्रिया (शस्त्रकर्म) असल्याच्या संदर्भात सांगतात, त्याप्रमाणेच हीसुद्धा अवैज्ञानिक आवाहने आहेत.

पुरोगामी पत्रकार श्री. विनोद दुआ यांच्याकडून हिंदु धर्माच्या संदर्भात केला जाणारा बुद्धीभेद पुढील सूत्रांचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल.

१. पुरोगामी पत्रकार सोमनाथावरील आक्रमणाचा इतिहास सांगतांना ज्यांचा इतिहासाचा काडीचाही अभ्यास नाही आणि जे व्यवसायाने अभियंता आहेत, अशा श्री. रमाशंकर सिंह यांच्या लिखाणाला ऐतिहासिक लिखाण म्हणून मांडण्याचा खोटेपणा करत आहेत.

२. सोमनाथावरील आक्रमणाचा इतिहास सांगतांना ते आक्रमण करणार्‍या मुसलमान आक्रमकाचे साधे नावही घेत नाहीत; मात्र पुजार्‍यांच्या मंत्रोच्चाराविषयी सविस्तरपणे सांगून स्वतःचा पुरोगामी खोटेपणा सिद्ध करत आहेत.

३. हिंदु धर्मशास्त्रात क्षत्रियाला क्षात्रधर्म, म्हणजे लढण्याचे कर्तव्य सांगितलेले आहे, तर ब्राह्मणांना ब्राह्मतेजाचे दायित्व दिलेले आहे. भगवान श्रीकृष्णानेही अर्जुनाला रणांगणात श्रीमद्भगवद्गीता सांगितली आणि युद्धापासून परावृत्त होणार्‍या अर्जुनाला लढण्यास प्रवृत्त करून महाभारताच्या युद्धात विजयी केले. येथे भगवंताने क्षत्रिय असणार्‍या अर्जुनाला लढण्याऐवजी मंत्रजप करण्यास सांगितलेले नाही, हे पुरोगामी लक्षात घेत नाहीत.

४. त्रेतायुगात असुरांचा त्रास वाढल्यावर ऋषिमुनींनी त्यांच्या निर्दालनासाठी प्रभु श्रीरामाचे आवाहन करून त्यांचे साहाय्य घेतले होते.

५. येथे रा.स्व. संघाचे नेते श्री. इंद्रेश कुमार यांनीही मंत्रोच्चाराचे केलेले आवाहन सर्वसामान्य जनतेसाठी आहे. त्यांनी कुठेही म्हटलेले नाही, चीनच्या सीमेवरील भारतीय सैन्य काढून घ्या आणि केवळ मंत्रोच्चार करत बसा. मात्र अर्धवट वाक्ये सांगून हिंदुत्वनिष्ठांची अपकीर्ती करण्याची सवय असणारे दुआ यांच्यासारखे पत्रकार येथेही त्याच कुटील नीतीचा वापर करत आहेत.

६. शरिराच्या आजारात औषधे घ्यावी लागतात, तर मानसिक आजारात औषधांसह काउन्सिलिंग आणि स्वयंसूचना घ्याव्या लागतात. विज्ञानातही सूक्ष्म तेवढे प्रभावी म्हटले जाते; मात्र हे पुरोगामी मंत्रांच्या शक्तीचा कोणताही शास्त्रीय अभ्यास न करताच त्या संदर्भात अयोग्य वक्तव्ये करतात. मंत्रोपासनेने सिद्ध झालेले अनेक योगी असून ते त्या सिद्धींचे जादूगाराच्या प्रयोगासारखे प्रदर्शन करत नाहीत. सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात तमिळनाडू येथील पू. रामभाऊस्वामी यांनी मंत्रोच्चार करत धगधगत्या यज्ञकुंडावर शरीर झोकून दिल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यामुळे मंत्रोच्चाराची खिल्ली उडवणार्‍या या पुरोगाम्यांनी त्यांच्याप्रमाणे ५ मिनिटे यज्ञकुंडावर झोकून देण्याचे आव्हान तरी स्वीकारावे.

७. विज्ञानाच्या प्रयोगाचे उत्तर योग्य येण्यासाठी ज्याप्रमाणे अनेक उपकरणांची, विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे मंत्रांचा लाभ होण्यासाठी तेथील वातावरण सात्त्विक असावे लागते, मंत्रोच्चार करणार्‍याचा उच्चार शुद्ध असावा लागतो, तसेच मंत्रोच्चार करणार्‍याची श्रद्धा असावी लागते, तरच मंत्राचे फळ मिळते, हे पुरोगामी लक्षात घेत नाहीत.

शेवटी या पुरोगाम्यांना एकच प्रश्‍न विचारावासा वाटतो की, एरव्ही हेच पुरोगामी हिंदुत्वनिष्ठांना कोणत्याही आंदोलनात हिंसक आणि आक्रमक ठरवत असतात. आता संघाचे नेते श्री. इंद्रेशकुमार जनतेला घरी बसून मंत्रोच्चाराचे आवाहन करत असतांना ते हिंदूंना भोळसट आणि अंधश्रद्धाळू ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून लक्षात घेतले पाहिजे, हिंदूंनी काहीही केले, तरी हे पुरोगामी त्यांच्या विरोधातच कार्य करणार आहेत. भारतीय सैन्य जेव्हा काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांवर पॅलेट गनचा वापर करत होते, तेव्हा हेच पुरोगामी त्याचा जनतेच्या विरोधातील हिंसा म्हणून विरोध करत होते. हीच पुरोगामी मंडळी आतंकवादी याकुब मेमनला फाशी होऊ नये; म्हणून सर्वोच्च न्यायालयात पहाटे ३ वाजता सुनावणी घेण्याचा आग्रह करत होती. खरेतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी अगणित क्रांतीकारकांनी बलिदान दिलेले असतांना जे पुरोगामी गांधींच्या चरख्यानेच भारताला स्वातंत्र्य मिळाले, अशी अंधश्रद्धा समाजात पसरवतात, त्यांना हिंदु धर्माच्या कोणत्याही शास्त्रावर टीका करण्याचा अधिकार नाही.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *