तथाकथित पर्यावरणवादी विश्वंभर चौधरी यांच्या समाजाची दिशाभूल करणार्या सूत्रांचे शास्त्रशुद्ध खंडण करणारे डॉ. विनय काटे यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावर पुरोगामी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी पर्यावरणपूरक (?) म्हणून ‘तुरटीचा गणपती’ बनवण्याविषयी पोस्ट केली होती. त्यावर डॉ. विनय काटे यांनी फेसबूकवर केलेला प्रतिवाद त्यांच्याच शब्दांत प्रसिद्ध करत आहोत.
१. पर्यावरणतज्ञ श्री. विश्वंभर चौधरी यांनी पुण्यातील एका व्यक्तीने केलेल्या तुरटीच्या गणपतीचा फोटो ‘शेअर’ करत, त्यासोबत लिहिले होते की, ‘या गणपतीच्या (तुरटीपासून सिद्ध केलेल्या मूर्तीच्या) विसर्जनाने प्रदूषण न होता, उलट नदी शुद्ध होते. तुरटी पाण्याला निवळते. गाळ खाली बसून पाणी काही अंशी शुद्ध होते.’
२. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एका टीव्ही चॅनेलनेही ही बातमी प्रसारित करून या अशास्त्रीय दाव्याला अजून प्रसिद्धी दिली. हा दावा कुणी इतर माणसाने केला असता, तर मी तो दुर्लक्षून पुढे गेलो असतो; पण जेव्हा टीव्हीवर चर्चा गाजवणारे, स्वतःला पर्यावरणतज्ञ म्हणवून घेणारे आणि फेसबूकवर अनेक लोक ज्यांच्या या दाव्याला खरे समजून ‘लाईक’ आणि ‘कमेंट’ करतात, अशा चौधरी सरांनी हा दावा केल्यावर तो दुर्लक्षून पुढे जाणे अशक्य आहे आणि जेव्हा यात प्रसारमाध्यमे येतात, तेव्हा हे खोटे दावे खोडून काढणे, हे दायित्व बनते.
३. मी माझ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी इमान राखून चौधरी सरांना काही वैज्ञानिक प्रश्न केले. पण त्यातील एकाही प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले नाहीत. उलट चौधरी सरांनी मलाच वितंडवादी, तुच्छतावादी, विनयहीन, उद्धट, मुद्दाविहिन आणि शाळकरी मुलापेक्षा कमी बुद्धीचा वगैरे विशेषणे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या वापरली. जिज्ञासूंनी त्यांच्या पोस्टवर आमचा हा वादविवाद कालानुक्रमे पहावा. चौधरी सर तो डिलीट न करता तसाच ठेवतील, अशी अपेक्षा आहे. चौधरी सर, तुमच्या दाव्यांशी संबंधित काही सुस्पष्ट वैज्ञानिक शंका येथे देत आहे, त्यावर आपण आपले ‘तज्ञ मत’ मांडावे –
१. ‘(तुरटीने) प्रदूषण होत नाही’ – तुरटी हा रासायनिक पदार्थ आहे. तो जलस्रोताचा नैसर्गिक भाग नाही. त्यामुळे स्वच्छ पाण्यात मिसळलेले इतर रासायनिक पदार्थ जसे प्रदूषक या व्याख्येत येतात, तसेच तुरटीसुद्धा एक प्रदूषकच ठरेल.
२. तुरटी हा खाद्यपदार्थ नाही. त्याचा अन्नपदार्थात समावेश हा प्रगत देशांत दीडशे वर्षांपासून भेसळ समजून प्रतिबंधित आहे.
३. ब्रेडच्या पिठात मिसळलेल्या तुरटीने मुलांना मुडदूस होतो. यावर Lancet या जगप्रसिद्ध शास्त्रीय निबंध पुस्तिकेमध्ये १८५७ साली डॉ. John Snow (MD) यांचा पेपर उपलब्ध आहे.
४. लाखोंच्या संख्येने जर हे तुरटीचे गणपति पाण्यात विसर्जित केले, तर त्यामुळे पुष्कळ मोठे जलप्रदूषण होणार आहे.
५. त्याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होणार आहे. मग कुठल्या शास्त्रीय आधारावर आपण हा दावा करता की याने प्रदूषण होणार नाही ?
६. ‘नदी शुद्ध होते. तुरटी पाण्याला निवळते. गाळ खाली बसून पाणी काही अंशी शुद्ध होते’, असे आपण म्हटले आहे. नदीच्या शुद्धतेचे काही निकष असतात, जसे की ‘बीओडी (Biological Oxygen Demand (BOD)’, ‘सीओडी (Chemical Oxygen Demand (COD)’, गढूळपणा (Suspended Particles’ इत्यादी. तुरटीने यातले गढूळ कण काही काळासाठी (अगदी काही तासांसाठी) तळाला जातील, तेसुद्धा साचलेल्या पाण्यात, वहात्या पाण्यात किंवा नदीत नाही !
७. पण हे गढूळ कण नाहीसे, तर होणार नाहीत ना ! तुरटीने नदीचा BOD, COD आणि suspended particle चे प्रमाण यावर कसलाच फरक पडणार नाही, मग नदी शुद्ध कशी होईल नेमकी ? घरातला केर प्रतिदिन झाडून बाहेर न टाकता घराच्या आतच कोपर्यात जमा केला, तर घर स्वच्छ होत नाही, त्यातलाच हा प्रकार आहे.
८. काही घंटे डोळ्यांना नदीचा खाली घाण बसलेला तळ दिसेल, नदी शुद्ध नाही होणार आणि समजा जर हा सगळा गाळ काही दिवस नदीच्या तळाशी असलेल्या जलवनस्पतींच्या पानांवर बसला तर त्याने त्यांचे प्रकाशसंश्लेषण थांबून त्या मृत झाल्या तर, सोबत मासेही मरतील उपासमारीने. याचा काही विचार आहे ?
९. बरं तुरटी सहज पाण्यात विरघळत नसते. तिला वेगाने पाण्यात फिरवावे लागते. तुरटीचा गणपति पाण्यात टाकायचा की, बोटीला बांधून गणपती विरघळेपर्यंत बोट गोल फिरवत बसायची ? नेमकं काय करायचंय तुम्हाला ? आणि कशासाठी ?
१०. चौधरी सर, पर्यावरणशास्त्र ही आधुनिक विज्ञानाची शाखा आहे. विज्ञानात भावनेला, श्रद्धेला, विनयाला किंवा झुंडीला स्थान नसते. विज्ञान संशयाने, प्रश्नाने, शंकेने, विरोधाने आणि चूक मान्य करून प्रगल्भ होते. कुठल्याही वैज्ञानिक चर्चेला न्यूटन, आईन्स्टाईनचे वंदन करून किंवा गॅलिलिओची आरती करून आरंभ होत नसतो.
रुदरफोर्डच्या atomic model मध्ये चुका काढल्या, म्हणून कुणी बोहर उद्धट ठरत नाही किंवा रुदरफोर्ड कमी ठरत नाही. आधुनिक विज्ञान का, कसे, कुठे, कधी, केव्हा, कुणी, कुणासाठी, कशासाठी या प्रश्नांवर चालते.
११. अपेक्षा करतो की, आपण माझी पोस्ट आपल्या ‘वॉल’वर घ्यावी. त्यावर आपले उत्तर द्यावे. जाहीर शास्त्रीय चर्चा करावी. माझे मुद्दे चुकीचे असल्यास मी क्षमा मागेन. तुमचे मुद्दे चुकीचे असल्यास तुम्ही ‘तुमची पोस्ट चुकलीय’, असे मान्य करावे आणि तसे लोकांना, टीव्ही आणि माध्यमांना सांगावे. तुमच्या-माझ्यात आणि संघी गोशास्त्रज्ञांत एवढा दिलदारपणाचा आणि बुद्धिप्रामाण्याचा तरी फरक असावा !
– डॉ. विनय काटे
संकलन – श्री. संकल्प झांझुर्णे, सातारा
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात