हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या हेतूने ख्रिस्ती प्रचारकांकडून विविध क्लृप्त्या योजल्या जातात. याचे एक उदाहरण म्हणजे सध्या ‘KNOW THE TRUTH AND TRUTH WILL SET YOU FREE (सत्य जाणा आणि हे सत्य तुम्हाला मुक्त करील !)’ या शीर्षकाखाली प्रसारित होत असलेला ‘व्हॉट्स अॅप’ संदेश ! या संदेशात ऋग्वेदातील ऋचांचे (श्लोकांचे) खोटे अर्थ लावून ‘वेद’ आणि ‘बायबल’ यांची शिकवण एकसमान असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या संदेशातील असत्य विचारांचे खंडण करणारा हा लेख…
१. ऋग्वेदातील मंडले ही ‘बायबल’मधील पुस्तकांसमान स्वतंत्र नाहीत !
१ अ. खोटा प्रचार : पवित्र बायबलमध्ये जशी ७३ पुस्तके आहेत, त्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये १० पुस्तके आहेत. याला ‘१० मंडले’ म्हणतात.
१ आ. खंडण : ‘बायबल’मध्ये असलेली पुस्तके येशूपूर्वीचे प्रेषित आणि येशू यांच्या अनुयायांनी लिहिलेली आहेत. ‘ती एकूण किती आहेत’, याविषयीही एकवाक्यता नाही. कॅथलिक ४६, प्रोटेस्टंट ३९, ऑर्थोडॉक्स ५१ असे प्रत्येक जण विविध संख्येने पुस्तके मानतात. सनातन धर्मात ऋग्वेदांविषयी असा सावळागोंधळ नाही ! ऋग्वेदामध्ये सर्व विषयांचे ज्ञान असून ते एकूण २१ शाखांमध्ये विभाजित आहे. यापैकी आज केवळ १ ‘शाकल’ शाखा उपलब्ध आहे. त्या शाखेतील ज्ञान १० मंडलांमध्येे वर्णित आहे. हे मंडल म्हणजे कोण्या अनुयायांनी लिहिलेली वेगळी पुस्तके नव्हेत !
२. प्रजापति ही देवता आहे; ‘देवपुत्र’ नव्हे !
२ अ. खोटे विधान : देवाच्या पहिल्या आणि एकमेव पुत्राचे नाव ‘प्रजापति’ आहे.
२ आ. खंडण : प्रजापति ही देवता आहे. ती देवपुत्र नाही. ‘ख्रिस्ती पंथानुसार असलेला एकमेव देवपुत्र येशू हाच कसा प्रजापति आहे’, हे सांगण्यासाठी कुठलाही संदर्भ न देणारे कावेबाज ख्रिस्ती !
३. प्रजापति देवता चराचर सृष्टीच्या अगोदरपासूनच पूर्णत्वाने विद्यमान होती !
३ अ. खोटे विधान : या पृथ्वीवर योग्य वेळी प्रजापति आला.
३ आ. खंडण
१. याला संदर्भ काय ?
२. ‘विश्वाचे बीज असलेला हिरण्यगर्भ प्रजापति सर्व चराचर सृष्टीच्या अगोदर पूर्णत्वाने विद्यमान होता’, असे ऋग्वेदात (ऋग्वेद, मंडल १०, सूक्त १२१, ऋचा १) स्पष्टपणे प्रतिपादित केले आहे, म्हणजे ती देवता योग्य वेळी पृथ्वीवर आली, असे होऊ शकत नाही !
३. संपूर्ण विश्व म्हणजे केवळ ख्रिस्ती पंथांप्रमाणे पृथ्वी नव्हे, तर त्यात सनातन सिद्धांतांनुसार सर्व ब्रह्मांडे आणि आकाशगंगा यांचा समावेश होतो. येथेच सनातन धर्माची व्याप्ती अन् ख्रिस्ती पंथाची संकुचितता स्पष्ट होते !
४. प्रजापति देवता मानवाची रक्षणकर्ता नव्हे, तर पालनकर्ता !
४ अ. खोटे विधान : प्रजापति म्हणजे मानवाचा रक्षणकर्ता !
४ आ. खंडण : ‘प्रजापति’ या शब्दाचा अर्थ ‘मानवाचा रक्षणकर्ता’ असा होत नाही. प्रजापति हा शब्द ‘प्रजा + पति’ या दोन शब्दांपासून बनला आहे. प्रजापति म्हणजे प्रजेला उत्पन्न करणारा आणि तिचे पालन करणारा देव.
५. ‘प्रजापति जन्म होताक्षणी विश्वाचा रक्षणकर्ता बनला’, असे सांगणारी एक ऋचा ऋग्वेदात नाही !
५ अ. ऋग्वेदामधील ऋचा
हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् ।
स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम ॥
– ऋग्वेद, मंडल १०, सूक्त १२१, ऋचा १
५ आ. ख्रिस्त्यांनी लावलेला मनमानी अर्थ : प्रारंभी देव आणि त्याचे सर्वश्रेष्ठ चैतन्य एवढेच अस्तित्वात होते. देवाच्या सर्वश्रेष्ठ चैतन्यापासून हिरण्यगर्भ म्हणजेच देवपुत्र प्रजापति निर्माण झाला, जो प्रकाशरूपात होता. जन्म होताक्षणी तो विश्वाचा रक्षणकर्ता बनला.
५ आ १. वेदांच्या लावलेल्या मनमानी अर्थाशी साम्य दर्शवणारे बायबलमधील विधान देणे : ईश्वर म्हणतो ‘‘जो आहे, जो होता आणि जो येणार आहे, तो सर्वशक्तीमान आहे.’’ (साक्षात्कार, १.८)
५ इ. वैदिक संस्कृतानुसार योग्य अर्थ : सुवर्णाप्रमाणे अविकारी असे विश्वाचे बीज असलेला हिरण्यगर्भ प्रजापति सर्व चराचर सृष्टीच्या अगोदर पूर्णत्वाने विद्यमान होता. तो प्रजापति, म्हणजे परमात्मा आरंभापासूनच सर्व चराचर वस्तूंचा एकमेव अधिपति आहे. त्यानेच ही पृथ्वी आणि हा द्युलोक (स्वर्गलोक) धारण केला आहे. आम्ही हे हवन त्याच्यासाठीच करत आहोत. (येथे ‘कस्मै’ या शब्दाचा अर्थ ‘कोणासाठी’ असा नसून ‘प्रजापतीसाठी’ असा आहे. ‘क’ म्हणजे ‘प्रजापति’.)
५ ई. निष्कर्ष
१. ‘चराचर सृष्टीत पूर्णत्वाने विद्यमान असलेल्या प्रजापती देवतेला ‘एकमेव देवपुत्र’ संबोधणे, ‘जन्म होताक्षणी तो विश्वाचा रक्षणकर्ता बनला’, असे धादांत खोटे सांगणे इत्यादी शाब्दिक फेरफार करून धूर्तपणे प्रजापति आणि येशू यांचे साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
२. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ऋग्वेदांमध्ये सर्व पदार्थांचे ज्ञान आहे. ते मंत्रद्रष्ट्या ऋषींना स्फुरले आहे. त्यात देवता काही सांगत नाहीत. बायबलमध्ये मात्र ख्रिस्त्यांचा ‘लॉर्ड’ (ईश्वर) त्या एकमात्र देवपुत्राविषयी माहिती देतो !
६. प्रजापति कोणाच्याही कृत्याची परतफेड करण्यासाठी नव्हे, तर प्रजेचे पालन करण्यासाठी कार्य करतो !
६ अ. ऋग्वेदातील ऋचा
पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् ।
उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ॥
– ऋग्वेद, मंडल १०, सूक्त ९०, ऋचा २
६ आ. ख्रिस्त्यांनी लावलेला मनमानी अर्थ : हा मानव म्हणजेच देवाचा प्रथमपुत्र होता, आहे आणि पुढेही असेल अन् प्रत्येकाला त्याच्या कर्माची परतफेड करायला लावण्यासाठी तो या पृथ्वीवर येतो.
६ आ १. वेदांच्या लावलेल्या मनमानी अर्थाशी साम्य दर्शवणारे बायबलमधील विधान देणे : ‘‘धीर धरा, मी लवकरच येत आहे, मी माझ्यासह त्याच्या कृत्याची जी परतफेड त्याला करायला लावणार आहे, ती घेऊन येत आहे. (साक्षात्कार, २२.१२)
६ इ. वैदिक संस्कृतानुसार योग्य अर्थ : या सृष्टीतील विद्यमान जीव हे पुरुषाचे म्हणजे परमात्म्याचे अवयव आहेत. जे आतापर्यंत होऊन गेले किंवा जे अद्याप पुढे व्हायचे आहेत, तेही त्याचेच अवयव होत. हा परमात्मा अमृतत्वाचा, म्हणजे जन्म-मृत्यूरहित स्थितीचा अधिपती आहे. अन्नामुळे ज्यांची वाढ होते, अशा प्राणीमात्रांचा स्वामीही तोच आहे.
६ ई. निष्कर्ष
१. ख्रिस्त्यांनी लावलेला मनमानी अर्थ आणि वैदिक अर्थ हे अल्पांशानेही जुळत नाहीत.
२. ‘सुक्तातील पुरुष (परमात्मा) म्हणजे प्रथमपुत्र येशू आहे’, हे सांगण्यासाठी केलेला खोडसाळपणा येथे स्पष्टपणे दिसून येतो. ऋचेतील ‘पुरुष’ हा परमात्मा या अर्थी आहे, तर त्याचा ‘मॅन’ म्हणजे ‘मानव’ असा अर्थ लावणे हास्यास्पद आहे !
३. हिंदूंच्या देवता परतफेड करण्यासाठी विद्वेषी भावनेने पृथ्वीवर अवतरित होत नाहीत, तर सनातन सिद्धांतानुसार (श्रीमद्भगवद्गीतेनुसार) जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा धर्मसंस्थापनेसाठी पुन्हा पुन्हा पूर्णावतार किंवा अंशावतार म्हणून अवतरित होतात !
७. यज्ञ म्हणजे येशूने क्रुसावर दिलेले बलिदान ‘सॅक्रीफाईस’ नव्हे !
७ अ. ऋग्वेदातील ऋचा
तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः ।
तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये ॥
– ऋग्वेद, मंडल १०, सूक्त ९०, ऋचा ७
७ आ. ख्रिस्त्यांनी लावलेला मनमानी अर्थ : हा देवाचा प्रथमपुत्र, ज्याला लाकडाच्या पवित्र खांबाला बांधण्यात आले, त्याने देव आणि राजा अन् यज्ञकर्ते ऋषि यांच्या समक्ष तिथे देहत्याग केला.
७ आ १. वेदांच्या लावलेल्या मनमानी अर्थाशी साम्य दर्शवणारे बायबलमधील विधान देणे : येशू ख्रिस्ताच्या चार शिकवणींमध्ये (Gospel) म्हटले आहे, राज्यकर्त्यांनी (होरोड आणि पायलेट) आणि ज्यू धर्मगुरूंनी (Annas and Caiaphas) जीझसला लाकडी क्रॉसवर फाशी दिले.
७ इ. वैदिक संस्कृतानुसार योग्य अर्थ : प्रजापतीसारख्या सृष्टीला उत्पन्न करणार्या देवता आणि मंत्रद्रष्टे ऋषी यांनी सृष्टीच्या आरंभी विद्यमान असलेल्या त्या यज्ञयोग्य परमात्म्याचे मानस यज्ञात प्रोक्षण केले अन् त्या परमात्म्याद्वारेच मानस यजन केले.
७ ई. निष्कर्ष
१. ‘यज्ञ’ या शब्दाला इंग्रजीत ‘सॅक्रीफाईस’(sacrifice)’ हा शब्द वापरला जातो. त्याचा येशूच्या देहत्यागाशी, म्हणजे ‘सॅक्रीफाईस’शी संबंध जोडणे, हे हास्यास्पद आहे.
२. संपूर्ण ऋचेमध्ये ‘लाकूड’ या शब्दाचा उल्लेख नसूनही तो शब्द मनमानी अर्थांमध्ये घुसडण्यात आला आहे.
३. ‘सीयर (Seer)’ हा शब्द ‘यज्ञकतेर्र् ऋषि’ आणि ‘ज्यू धर्मगुरु’ यांना एकसमान लावून सनातन धर्मातील महान ऋषींना विद्वेषी धर्मगुरूंसमान संबोधणे, हे हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे आहे !
८. ख्रिस्ती पंथात ‘हेवन’ म्हणजे ‘स्वर्ग’ एवढीच पारलौकिक संकल्पना असतांना त्यासाठी ‘मोक्ष’ हा शब्द वापरणारे धूर्त ख्रिस्ती !
८ अ. यजुर्वेदातील ऋचा
तमेव विदित्वातिमृत्युमेति नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ।
– यजुर्वेद, अध्याय ३१, कण्डिका १८
८ आ. ख्रिस्त्यांनी लावलेला मनमानी अर्थ : हा (त्याग) अखिल मानवाच्या पापमुक्तीचा आणि स्वातंत्र्याचा एकमेव मार्ग आहे. ते जे या मानवाचे ध्यान करतात आणि त्याची प्राप्ती करतात, त्याच्याविषयी हृदयात श्रद्धा ठेवतात अन् मुखाने त्याचे नाम घेतात, ते आपोआप या जगातून मुक्त होतात आणि याशिवाय मोक्षाचा मार्ग नाही.
८ आ १. वेदांच्या लावलेल्या मनमानी अर्थाशी साम्य दर्शवणारे बायबलमधील विधान देणे : ‘तुम्ही जर जीझस हा देव आहे’, अशी तुमच्या मुखाने स्वीकृती दिली आणि ‘देवाने त्याला मृत्यूनंतर जिवंत केले आहे’ अशी श्रद्धा ठेवली, तरच तुमचे रक्षण होईल.’ (रोमन १०:९)
८ इ. वैदिक संस्कृतानुसार योग्य अर्थ : त्या हिरण्यगर्भाला जाणल्यावरच जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होता येते. यासाठी दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही.
८ ई. निष्कर्ष
१. हिरण्यगर्भाने, म्हणजे प्रजापतीने कोठेही बलिदान दिलेले नाही !
२. ‘यजुर्वेदात यज्ञ आणि त्याद्वारे केली जाणारी कर्मे’ यांविषयी ज्ञान असून त्यात ध्यान, नामस्मरण आदी उपासना सांगितलेली नाही. धूर्त ख्रिस्त्यांनी हे अर्थ ‘बायबल’पूरक होण्यासाठी केलेली धडपड येथे लक्षात येते !
९. ख्रिस्त्यांच्या संकुचित प्रार्थनेचे एक उदाहरण !
९ अ. अयोग्य प्रार्थना : ‘कृपया हे वाचून संपूर्ण जग एका देवपुत्राच्या आणि पवित्र चैतन्याच्या ठिकाणी एक होऊ दे’, अशी प्रार्थना करा.
९ आ. योग्य दृष्टीकोन : हिंदु धर्मात ३३ कोटी देवता आहेत. प्रत्येक देवतेचे कार्य आणि वैशिष्ट्य भिन्न आहे. श्री गणपति ही विद्येची, तर वरुणदेवता पावसाची देवता आहे. अग्निदेव ही यज्ञाची देवता आहे. इंद्रापासून कामदेवापर्यंत आणि सूर्यदेवापासून यमदेवापर्यंत हिंदूंच्या एकूण ३३ कोटी देवता आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रकृतीनुसार तिला एका विशिष्ट देवतेची उपासना आवश्यक असतांना ख्रिस्ती आणि इतर पंथ एकेश्वरवादी शिकवण देतात ! विविध रोगांवर एकच औषध देणे, हे जेवढे चुकीचे आहे, तेवढेच सर्वांनी एकाच देवतेची उपासना करणे, हेही निरुपयोगी आणि हास्यास्पद आहे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात