Menu Close

प. पु. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांच्या गरुडेश्‍वर येथील समाधी मंदिराचे छायाचित्रात्मक दर्शन

प. पु. वासुदेवानंद टेंब्येस्वामी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…

प. पु. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांची मूर्ती

दत्तावतारी प. पु. वासुदेवानंद टेंब्येस्वामी यांनी वर्ष १९१४ मध्ये गुजरात राज्यातील गरुडेश्‍वर (जिल्हा नर्मदा) येथे समाधी घेतली होती. नर्मदा नदीच्या तिरावर असलेल्या या तीर्थक्षेत्राच्या शेजारीच नर्मदेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. नर्मदा परिक्रमा करतांना या दोन्ही तीर्थस्थळांचे दर्शन घेता येते.

याच कडूलिंबाच्या झाडाखाली प. पु. टेंब्येस्वामी यांची कुटी होती. त्या झाडाची पाने तेव्हा गोड लागत.

प. पु. श्री. टेंब्येस्वामी महाराज हे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत ! प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभुच त्यांच्या रूपाने अवतरले आणि त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली आणि चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा अन् अधिष्ठान प्राप्त करून दिले. श्री श्रीपाद श्रीवल्लभस्वामींचे जन्मस्थान पीठापूर आणि श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान-कारंजा, ही दोन्ही ठिकाणे शोधून काढून तेथेही उपासना चालू करून दिली. त्यांची ‘शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।’ ही करुणात्रिपदी अनेक दत्तभक्त प्रतिदिनच गात असतात. त्यांची प्रकांड विद्वत्ता आणि विलक्षण बुद्धिमत्तेचे लोभस दर्शन त्यांच्या विविध ग्रंथांमधून आपल्याला होते. प. पु. स्वामीजी उत्तम ज्योतिषी आणि आयुर्वेदिक औषधांचे जाणकार म्हणूनही प्रसिद्ध होते. संस्कृत आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून अत्यंत सहजतेने संचार करणारी त्यांची अद्भुत प्रतिभा भल्या-भल्या पंडितांना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. त्यांनी रचलेले ‘श्रीदत्तमाहात्म्य’, ‘सप्तशती गुरुचरित्रसार’, ‘दत्तलीलामृताब्धिसार’, ‘त्रिशती गुरुचरित्र’, ‘द्विसाहस्री गुरुचरित्र’, ‘श्रीदत्तपुराण’, यांसारखे ग्रंथ, तसेच अत्यंत भावपूर्ण अशी शेकडो स्तोत्रे ही श्रीदत्तसंप्रदायाचे अलौकिक वैभवच आहे ! त्यांनी रचलेली पदे, अभंग त्यांच्या परम रसिक अंत:करणाचा प्रत्यय देतात. ते अतुलनीय भाषाप्रभु, तर होतेच शिवाय त्यांची स्मरणशक्ती देखील प्रचंड होती. मनाने अत्यंत भावूक आणि अनन्यशरणागत असे ते एक थोर भक्तश्रेष्ठही होते; हेच त्यांच्या अतिशय विलोभनीय, भावपूर्ण रचनांचे खरे रहस्य आहे !

प. पु. टेंब्येस्वामी यांचे चरणपादुका मंदिर
प. पु. टेंब्येस्वामी यांचे चरणपादुका
गरुडेश्‍वर (जिल्हा नर्मदा, गुजरात) येथील समाधी मंदिर ! प. पु. टेंब्येस्वामी यांचे पावन सहवास लाभलेले हेच ते स्थान !
प. पु. स्वामींच्या समाधीवरील शिवपिंडी ! या पिंडीवर ब्रह्मस्वरूप कमळ, विष्णुस्वरूप चरण आणि शिवस्वरूप लिंग आहे. म्हणजेच प. पु. टेंब्येस्वामी त्रिगुणातीत सद्गुरु आहेत.

आज प. पु. टेंब्येमहाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अशा अलौकिक विभूतीच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्याचे भाग्य आपणाला लाभले आहे. त्यासाठी कोटी कोटी कृतज्ञता ! ‘दत्तावतारी संतपरंपरेचा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी आशीर्वाद लाभावा’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *