मराठी भक्तीपरंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेले संत तुकाराम महाराज यांनी संसारातील सर्व सुख-दुःखे परखडपणे अनुभवत आपली वृत्ती विठ्ठलचरणी स्थिर केली. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले. त्यानिमित्त भागवतधर्म मंदिराचा कळस असलेले संत तुकाराम महाराजांची माहिती देणारा हा लेख…..
बालपण ते प्रापंचिक जीवन
संत तुकाराम महाराजांचा जन्म पुण्यानजीक असलेल्या देहु या गावात झाला. वडील बोल्होबा व आई कनकाई यांच्या पोटी जन्मलेल्या तुकाराम महाराज यांचे आडनाव अंबिले होते. त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभरबुवा हे महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचा मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली. घरी अठरा विश्वे दारिद्र्य आले.
परमार्थाची वाटचाल
संत तुकाराम महाराजांना त्यांचे सद्गुरु बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नदृष्टांत देऊन गुरुमंत्र दिला. पांडुरंगावरील निस्सिम भक्तीमुळे त्यांची वृत्ती विठ्ठलचरणी स्थिरावू लागली. पुढे मोक्षाची इच्छा तीव्र झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी देहूजवळच्या पर्वतावर एकांतात ईश्वरसाक्षात्कारासाठी निर्वाण मांडले. तिथे पंधरा दिवस अखंड एकाग्रतेने नामजप केल्यानंतर त्यांना दिव्य अनुभव प्राप्त झाला.
सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर संत तुकारामांनी ‘बुडती हे जन देखवेना डोळां ।’, अशी कळकळ व्यक्त करून लोकांना भक्तीमार्गाचा उपदेश केला. ते नेहमी पांडुरंगाच्या भजनात निमग्न असत. पांडुरंगाचे नाम हे अमृतासमच आहे, तेच माझे जीवन आहे, असे ते कीर्तनातून सांगत. ‘धर्म रक्षावयासाठी । करणे आटी आम्हासी ।’, असे म्हणत संत तुकारामांनी वेद आणि धर्मशास्त्र यांची सदैव पाठराखणच केली. तुकाराम महाराजांनी संकटाच्या खाईत पडलेल्या समाजाला जागृतीचा, प्रगतीचा मार्ग सांगितला. पारतंत्र्यात केवळ हीनदीन झालेल्या समाजाला सात्त्विक पंथ दाखवला. भक्तीयोग सन्मानित केला. हजारो भक्तांना एका छत्राखाली आणले. विचार तसाच आचार असावा, हे समाजाला शिकवले.
विरक्त संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराज यांनी कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली होतीच. महाराजांनी तुकोबारायांना सन्मानित करण्यासाठी अबदगिरी, घोडा, संपत्ती पाठवली. विरक्त अशा तुकोबारायांनी ‘पांडुरंगावाचून आम्हाला दुसरे काहीही आवडत नाही’, असे सांगून ते परत पाठवले. उत्तरादाखल त्यांनी चौदा अभंग रचून पाठवले.
राष्ट्ररचनेचे कार्य
एकदा शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेले होते. इतक्यात मुसलमानांनी त्या मंदिराला वेढा घातला. अशा वेळी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी तुकोबांनी विठोबाचा मनःपूर्वक धावा केला. त्यांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने शिवाजीचे रूप घेऊन सर्वांचे प्राण वाचविले. शिवाजी महाराजांकडून पुढील हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य व्हावयाचे होते, हे जाणूनच तुकोबांनी त्यांचे प्राण वाचविले. जशी शिवाजी महाराजांची व त्यांची भेट झाली होती, तशी रामदासस्वामींशीही त्यांची भेट झाली. या तिघांनी एका आदर्श राष्ट्राची कल्पना साकारायचा फार मोठा प्रयत्न केला.
अभंगरचनेचे महात्म्य
कवित्वाचा स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर त्यांनी अभंग रचण्यास प्रारंभ केला. पूर्वीपासून ध्यान, चिंतन यांमध्ये आयुष्य घालविल्याने अशाच उन्मनीअवस्थेत त्यांनी आपल्या रसाळ वाणीत अनेक अभंगरचना केल्या. अभंग हे तुकाराम महाराजांचे वैशिष्ट्य होते, जसे श्लोक वामनाचे, ओवी ज्ञानेश्वरांची, तसे अभंग करावा तुकारामांनीच. त्यांचे अभंग भक्ती, ज्ञान, वैराग्य व नीती या विषयांना धरून आहेत.
तुकाराम महाराजांनी संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून वाघोली गावातील रामेश्वरशास्त्री यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्यास सांगितले. गाथा बुडवल्यानंतर त्या तेरा दिवसांनी नदीतून परत वर आलेल्या पाहून रामेश्वरशास्त्री यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी महाराजांचे शिष्यत्व पत्करले.
आनंदमय संत तुकाराम महाराजांचा देहत्याग
संत तुकाराम महाराजांच्या साधुत्वाची आणि कवित्वाची कीर्ती सर्वत्र पसरली. त्या वेळी आनंदावस्थेत त्यांना स्वतःसाठी काहीही प्राप्त करावयाचे नव्हते. ‘तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता ।’ अशा अवस्थेत ते होते. आपल्या भक्तीबळावर ‘आकाशाएवढ्या’ झालेल्या संत तुकारामांनी वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सदेह वैकुंठगमन केले. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
संकलक : बालसंस्कार गट