भक्तवत्सल पांडुरंग




बालमित्रांनो, पांडुरंगाचे परमभक्त संत तुकाराम महाराज हे नेहमी पांडुरंगाच्या नामात दंग असायचे. एकदा त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. श्राद्ध म्हणजे मरण पावलेल्या व्यक्तीची पुण्यतिथी. त्यासाठी दोन ब्राह्मणांना बोलावले होते. त्यांना फळे आणि दक्षिणा द्यायची होती. मगच घरातील सर्वांची जेवणे व्हायची होती. काय सामान आणायचे ते सांगून जिजाईने त्यांना लवकर घरी यायची आठवण करून दिली. तुकाराम घरातून बाहेर पडले. मार्गावरून चालतांनाही त्यांचे पांडुरंगाचे नामस्मरण चालू होते. ते गावाबाहेर पोहोचले, तेव्हा एका शेतात कापणीचे काम चालू असलेले त्यांना दिसले. तुकारामांना पाहून शेतकरी म्हणाला, ”काम करायला येता का ? काम कराल तर वेतन देईन, दाणेही देईन.”

तुकाराम शेतात गेले आणि कणसे तोडू लागले. घरचे काम पार विसरूनच गेले. दुपार होत आली. ब्राह्मणही यायचे झाले होते. काय करायचे जिजाईला सुचत नव्हते. थोड्याच वेळात तुकाराम घरी आले. जिजाईने सांगितलेले सर्व सामान त्यांनी आणले होते. ती झटपट सिद्धतेला लागली. तुकाराम नदीवर गेले आणि आंघोळ करून घरी आले. तोपर्यंत ब्राह्मण आलेच होते. तुकारामांनी त्यांच्या पुढे केळी, पेरू आणि दुधाचे पेले भरून ठेवले अन् ते ग्रहण करण्याची प्रार्थना केली. नंतर तुकारामांनी ब्राह्मणांना दक्षिणा अर्पण करून नमस्कार केला. तुकारामांना आशीर्वाद देऊन ब्राह्मण घरी गेले. त्यानंतर सर्वांची जेवणे झाली. तुकाराम आपल्या बायकोला म्हणाले, ”जिजा, आता तू जेव. मी देवळात जातो आणि थोडा वेळ पडतो.” तुकाराम देवळाकडे निघून गेले.

जिजाईने स्वस्थपणे जेवण उरकले. ती बाहेर आली आणि पहाते तर समोरून तुकाराम येत आहेत. तुकाराम फार दमलेले दिसत होते. तिला नवल वाटले. आताच तर तुकाराम घरी आले, ब्राह्मणांना फळे दिली, दक्षिणा दिली, सर्व कामे पूर्ण केली, हे आपण स्वत: पाहिले आणि आता पहाते हे दुसरेच ! ती तशीच देवळात गेली. तेथे कुणीच दिसत नव्हते. जिजाई पुरी भांबावली होती. तिने सारा प्रकार घरी येऊन तुकारामांना सांगितला. त्यांनी क्षणभर डोळे मिटले, हात जोडले आणि पांडुरंगाला प्रार्थना करू लागले. मग त्यांना सारा प्रकार समजला. तुकारामांच्या डोळयांतून अश्रू वाहू लागले. ते मोठ्या आनंदाने तिला म्हणाले, ”जिजा, तू खरी भाग्यवान ! आज पंढरीरायांनी माझे रूप घेतले. त्यांनीच तू सांगितलेले सामान आणून दिले आणि आजचा कार्यक्रम उत्तमरीतीने पार पाडला. वाटेत एका शेतकऱ्याने मला कामाला बोलावले. मी तेथे गेलो आणि घरचे काम विसरूनच गेलो. आज देवानेच माझी लाज राखली.”

मुलांनो, नामस्मरणाचा महिमा पाहिलात ना ! प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांचे रूप घेऊन सांगितलेले सामान आणून दिले आणि सर्व विधी उत्तमरीतीने पार पाडला. त्याने आपल्या भक्ताची लाज राखली.

Leave a Comment