कोणताही निर्णय घेण्याआधी जवळच्यांना अथवा वरिष्ठांना त्याविषयी विचारणे, हा मनुष्यप्राण्याच्या प्राकृतिक स्वभाव असणे
`प्रत्येक दिवसागणिक होणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्या आज राज्यस्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. प्रतिदिन या संख्येत भरच पडते आहे. यापूर्वीही लहान मुलांच्या आत्महत्यांचे प्रसंग घडले नाहीत, असे नाही; परंतु अशा प्रकारे आत्महत्यांची मालिका सिद्ध होण्याची वेळ ही पहिलीच. कोवळया वयात मुलांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे, हे जसे आश्चर्यकारक आहे, तसे त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या किंवा तशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या घटकांचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. जीवन म्हणजे काय, ते जगायचे कसे, फुलवायचे कसे, जीवनात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे कसे जायचे, जीवनातील निर्णय घ्यायचे कसे आणि त्यातून सामाजिक अन् कौटुंबिक भान राखायचे कसे, हा सारा भाग विद्यार्थी अवस्था ते तारुण्य यामध्ये मनुष्य शिकत असतो. या काळात येणाऱ्या अनुभवातून तो पुढे पुढे मार्गक्रमण करत असतो. या सर्व प्रवासात त्याला आवश्यकता असते ती योग्य मार्गदर्शनाची, त्याच्या भावनांना समजून घेणाऱ्या सहकाऱ्यांची. मग तो सहकारी कोणी का असेना. आई-वडील असोत, मित्र-मैत्रिणी असोत, शिक्षक असोत वा अन्य कोणी असोत. कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या जवळच्यांना अथवा वरिष्ठांना त्याविषयी विचारणे, हा मनुष्यप्राण्याच्या प्राकृतिक स्वभावच आहे. मग तो निर्णय एखादी नवीन वस्तू विकत घेण्याची असो वा जीवनातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा असो. या वेळी जर योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही, तर मनुष्य दुसऱ्या टोकाचाही निर्णय घ्यायला मागे-पुढे पहात नाही.
मनाला मानसिक आधाराची, भावनांना समजून घेण्याची नितांत आवश्यकता असल्याने त्यांची निकड पालकच पुरवू शकणे
मुलांच्या आत्महत्यांमागील बहुतांशी कारण हे पालकांचा त्यांच्यावरील वाढता दबाव, कोवळया वयात त्यांच्यावर लादलेले अपेक्षांचे ओझे, असे म्हटले जात आहे आणि बऱ्याच प्रमाणात ते खरेही आहे. सध्याच्या धावत्या जगात आई-वडील दोघेही मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी चाकरी करण्याचा, धनसंचय करण्याचा मार्ग स्वीकारतांना पहायला मिळतात. ज्या कोवळया वयात मुलांवर संस्कार घडवण्याची आवश्यकता असते, त्या वयातच दिवसातील बराच वेळ त्यांच्यापासून दूर राहून काढला जातो. मुलांना आपली उणीव भासू नये; म्हणून हवे-नको ते त्यांना दिले जाते. घरात मन रमावे; म्हणून संगणक, व्हिडिओ गेम्स आणून दिले जातात. महागडे भ्रमणभाष (मोबाईल) दिले जातात. मुलाचा सांभाळ करण्यासाठी एखादी बाई कामाला ठेवली जाते. आपल्या पाल्याने शिकून मोठे व्हावे; म्हणून लाखो रुपये डोनेशन्स भरून नावाजलेल्या शाळेत प्रवेश घेतला जातो, सुप्रसिद्ध कोचिंग क्लासेस, शिकवणी लावली जाते. सर्व प्रकारची शैक्षणिक सामग्री आणून दिली जाते, गाइड्स आणून दिले जातात. हे सर्व दिले की, आपले आपल्या पाल्याप्रती इतिकर्तव्य संपले, आता आपल्या पाल्याने चांगल्यापैकी अभ्यास करावा, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे, ही अपेक्षा ते करू लागतात. परंतु मुले म्हणजे काही यंत्र नव्हेत की, चांगला कच्चा माल टाकला की, उत्तम दर्जाचे उत्पादन सिद्ध करू शकतील. मनुष्यप्राणी आणि निर्जीव वस्तू यांमधील मुख्य भेद हाच आहे की, मनुष्याला मन असते आणि त्या मनात भावना असतात. या मनाला मानसिक आधाराची, भावनांना समजून घेण्याची नितांत आवश्यकता या वयात असते आणि ही त्यांची निकड त्यांचे पालकच चांगल्यापैकी पुरवू शकतात.
आईचे प्रेम आणि वडिलांचा धाक मुलांना शिस्त लावत असणे
पूर्वी पालक आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी अहोरात्र मेहनत घेत असत. जन्माला येणारे मूल गर्भात असतांनाच त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत; म्हणून स्त्रिया रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथांचे वाचन करत असत. मुलाला समजायला लागले, चार शब्द बोलता येऊ लागले की, त्याला शुभंकरोती म्हणणे, रामरक्षा पाठांतर करणे, गीतेतील अध्याय म्हणणे, जेवतांना प्रार्थना करून जेवणे, दिवेलागणीच्या वेळेस आणि शाळेत जातांना देवासह घरातील मोठ्यांच्याही पाया पडणे, यांसारखे संस्कार घडवले जात असत. अभ्यास, खेळ, अल्पाहार, जेवण यांच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जात असत. जेवणातही मुलांना पौष्टिक असा आहार दिला जात असे. आई, आजी आणि आजोबा यांजकडून इतिहासातील शूरवीरांच्या, समाजसुधारकांच्या गोष्टी ऐकवल्या जात असत. आईचे प्रेम आणि वडिलांचा धाक मुलांना शिस्त लावत असे. बालपणीच योग्य ते संस्कार मिळाल्याने पुढे व्यवहारातही त्यांना ते उपयोगी पडत असत.
आधुनिक साधनाच मुलांच्या कोवळया मनावर संस्कार करत असणे
सध्या मात्र चित्र फार पालटले आहे. आई-वडील चाकरी करू लागल्याने मुलांवर संस्कार ते कसे घडणार ? त्यात केबल दूरचित्रवाणी, संगणकीय जाल (इंटरनेट), व्हीडिओ गेम घरोघरी आल्याने ही आधुनिक साधनेच मुलांच्या कोवळया मनावर संस्कार करू लागली आहेत. केबल दूरचित्रवाणीवर दाखवले जाणारे हिंसक आणि बीभत्स चित्रपट आजचे पालक आपल्या लहानग्यांसह बसून पाहू लागले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या मर्यादा शिथील झाल्याने पूर्वी चित्रपटगृहांतही जी दृश्ये पहायला मिळत नसत, ती आता प्रत्येक चित्रपटात घर बसल्या पहायला मिळू लागली आहेत. निराशा, अपयश आल्यावर मृत्यूला कवटाळायचे असते, याचे धडे मुलांना अशा चित्रपटांतून मिळू लागले आहेत. आत्महत्या करण्याच्या विविध पद्धतींविषयीचे ज्ञान त्यांना संगणकीय जालावर, दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सहज मिळू लागले आहे. ज्यामुळे आतापर्यंत परदेशात घडणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्या आज महाराष्ट्रातही घडू लागल्या आहेत.
अपयशातून मनाला झालेला घाव भरून काढण्यासाठी व्यसनाला जवळ केले जाणे अथवा आत्महत्या करणे
दूरचित्रवाणी, संगणकीय जाल यांसारखी लोकहितासाठी बनवली गेलेली माध्यमे आज लोकांच्याच जिवावर उठली आहेत. संगणकीय जालामुळे जग जवळ आले, असे म्हणतात; पण जग जसे जवळ आले, तसे त्या जगातील चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टीच लोकांवर परिणाम करू लागल्या आहेत. वाईट सवयी पटकन लागतात, त्याप्रमाणे मानवाने वाईटालाच अधिक जवळ केले आहे. इंग्रज जाऊन आज ६२ वर्षे उलटल्यानंतर देशाचे भावी आधारस्तंभ पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जाऊ लागले आहेत. अनैतिक गोष्टींचे स्तोम माजू लागले आहे. नितीमत्ता लयाला जाऊ लागली आहे. जीवनात येणारे अपयश पचविण्याची क्षमता आजच्या तरुणांत राहिलेली नाही. अपयशातून मनाला झालेला घाव भरून काढण्यासाठी एकतर व्यसनाला जवळ केले जाते, नाहीतर मरणाला कवटाळले जात आहे. तरुणांचा कित्ता आता हळूहळू किशोरवयीन मुलेही गिरवू लागली आहेत. हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आपला आत्मविश्वास ढळता कामा नये !
आज पुन्हा एकदा आवश्यकता आहे, मुलांना पुराणातील, इतिहासातील गोष्टी सांगण्याची, त्यांच्यातील सुप्त असा आत्मविश्वास जागृत करण्याची. चिमुकल्या वयात अखंड ईश्वरभक्ती करून ध्रुवाने अढळपद प्राप्त करून घेतले, मरणयातना भोगूनही प्रल्हादाने नारायणाचा गजर मुखातून विरू दिला नाही. त्यामुळे भगवंताला त्याच्या रक्षणासाठी नृसिंह अवतार घ्यावा लागला. वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी अखंड विश्वाला मार्गदर्शक ठरणारी ज्ञानेश्वरी लिहिली. सतराव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी शत्रूच्या दाढेतून तोरणा गड मिळवला. २२ व्या वर्षी झाशीची राणी गोऱ्यांवर तुटून प्राणपणाने लढली. या साऱ्या घटना आपल्याला काय सांगतात ? परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आपला आत्मविश्वास ढळता कामा नये. प्रत्येकामध्ये देवाने सुप्त अशी शक्ती दिलेलीच आहे. आपल्याला तिला केवळ जागृत करायचे आहे. ती एकदा जागृत झाली की, कितीही मोठी संकटे येवोत, त्यांना सामोरे जाऊन ती परतवून लावण्याचे बळ आपल्यात येते. परीक्षेतील अपयश, कोणी दिलेली अपमानास्पद वागणूक ही काही मोठी संकटे नाहीत की, ज्यासाठी देवाने दिलेला सुंदर असा मानवजन्म क्षणांत संपवून टाकावा. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला जो धीरोदत्तपणे सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो. `अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’, असे म्हटले जाते. अपयशाला ढाल केले आणि आत्मविश्वासाची तलवार उपसली की, जीवनसंग्राम सहज जिंकता येतो, ही शिकवण आज मुलांना देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी पालक आणि शिक्षक यांनी पुढाकार घ्यायला हवा !
– श्री. घाणेकर, मुंबई.