राजकीय बंदीचे हाल बंद होण्यासाठी ६१ दिवसांच्या उपवासाचे अग्निदिव्य करून स्वतःला राष्ट्रासाठी समर्पित करणारे क्रांतीकारक जतींद्रनाथ दास !
१३ सप्टेंबर ! वर्ष १९२९ मध्ये दुपारी १ वाजता जतींद्रनाथ दास या क्रांतीकारकाने ६१ दिवसांचा उपवास करून आपले प्राण सोडले. ते सुभाषचंद्र बोस यांचा उजवा हात मानले जायचे. त्या काळी जतींद्रनाथांनी ३ वेळा तुरुंगवास भोगला. सुटून आल्यावर त्यांनी ‘दक्षिण कलकत्ता तरुण समिती’ काढली. परिणामतः बेंगाल ऑर्डिनन्स दंडविधानान्वये जतींद्रनाथांना परत कारागृहात डांबण्यात आले. कारागृहातील छळाचा निषेध म्हणून त्यांनी ३३ दिवस अन्न त्याग केला आणि त्यांची सुटका झाली; पण परत लाहोर कटात गोवून त्यांना तुरुंगात डांबले. त्या वेळी राजकीय बंदींना मिळणार्या निकृष्टतम वागणुकीचा निषेध म्हणून त्यांनी उपवास चालू केला.
त्यांनी बलपूर्वक देण्यात आलेले अन्न नाकारले. त्यामुळे सात-आठ जण त्यांच्या छातीवर बसले. आधुनिक वैद्यांनी नाकात नळी घातली. जतीनदास खोकले. त्यामुळे दूध फुफ्फूसात जाऊन ती बिघडली. त्यामुळे आधुनिक वैद्यांना पुन्हा बलपूर्वक घशात दूध वगैरे दवडणे अशक्य झाले. दिवसेंदिवस जतीन अशक्त होत चालले होते. हात हलवेना. पापणी हलवेना. इंग्रज शासनाने त्याला बाहेर रुग्णालयात नेऊन कोणाचा तरी खोटा जामीन देऊन सोडण्याचे ठरवले; पण जतीनदास यांनी खूण करून त्यास नकार दिला आणि त्याच्या खोलीतील अन्य क्रांतीकारकांनी ‘आमच्या मुडद्यावरून त्यांना न्यावे लागेल’, असे पोलिसांना ठणकावले. या झटापटीतच जतींद्रनाथाचे हृदय थांबेल, अशी भीती अधिकार्यांना वाटली आणि ते गेले. भारतमातेचा त्यागी सुपुत्र ! दुसर्यांना नीट जगता यावे म्हणून मरणारा ! राजकीय बंदीचे हाल बंद व्हावेत म्हणून अग्निदिव्य करणारा जतीन ! त्याची स्मृती भारतियांना अखंड स्फूर्ती देत राहील. आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या होमकुडांत अशा नरश्रेष्ठांच्या आहुती पडलेल्या आहेत. हे सर्वांनीच विशेषत: तरुणांनी लक्षात घेण्यासारखा हा दिवस आहे.’
संदर्भ : ‘उगवता दिवस’, डॉ. वि.म. गोगाटे आणि http://saneguruji.net