सुभाषचंद्र बोस – आझाद हिंद सेना


सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना, इंग्रजांशी लढण्यासाठी, त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा, हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.

१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना, महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता, की काही जाणकार असे मानतात, की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते, तर कदाचित भारताची फाळणी न होता, भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखिल असेच मानत होते.

आझाद हिंद सेना ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात भारताची सेना होती. याची स्थापना सुभाषचंद्र बोसनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात केली.

प्रत्येक हिंदुस्थानियाच्या अंगावर रोमांच उभे करणारे शब्द. आझाद हिंद सेना म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगाला गवसणी घालणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, चलो दिल्ली च्या गर्जना करीत हिंदुस्थानच्या दिशेने कूच करणारी स्वातंत्र्यसमराच्या कल्पनेने मोहरलेली सेना आणि देशासाठी प्राणार्पण करायला आसुसलेल्या हिंदुस्थानी स्त्रीयांची झाशी राणी पलटण. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरात झोकुन देणाऱ्या झाशीच्या राणीचे नाव घेतलेली पलटण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील निर्णायक पर्वातल्या लढ्यासाठी शस्त्रसज्ज झाली हा एक असामान्य योग आहे. भारताचे स्वातंत्र्य ‘लक्ष्मिच्या पावलांनी’ आले हे शब्द सर्वार्थाने खरे ठरतात

आपल्या देशाबाहेर पडुन साडे तीन वर्षे उलटुन गेलेल्या नेताजींना आपल्या मातृभूमीत परतायची अनिवार ओढ होती, पण त्यांना देशात प्रवेश करायचा होता तो शत्रूचा नि:पात करून व आपल्या मातृभूमीला दास्यमुक्त करून आपल्या सार्वभौम देशाचा एक सन्माननिय नागरिक म्हणुन. गेली साडेतीन वर्षे केलेली अपार मेहेनत व नियोजन आता फलस्वरुप होण्याची लक्षणे दिसु लागत होती, मात्र नेताजी म्हणजे दिवास्वप्न पाहणारा आशावादी मनुष्य नव्हता तर तो एक द्र्ष्टा होता. संपूर्ण तयारीनिशी व ताकदीनिशी हल्ला चढवुन तो निर्णायक व यशस्वी होण्याची पूर्ण खात्री झाल्यावर मगच ते आपला निर्णायक घाव घालणार होते. आणि असा निर्णायक हल्ला यशस्वी होण्यासाठी केवळ सैन्य व शस्त्रे पुरेशी नसून आपल्या देशातील बांधवांचा आपल्या प्रयत्नाला मनापासून पाठिंबा असणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले होते. किंबहुना जेव्हा आझाद हिंद सेना पूर्वेकडुन परकिय सत्तेवर बाहेरून हल्ला चढवेल त्याच वेळी जागृत झालेली व स्वतंत्र्यासाठी सज्ज झालेली सर्वसामान्य भारतीय जनता आतुन उठाव करेल व या दुहेरी पात्यांत परकियांचा निभाव लागणार नाही आणि नेमका तोच स्वातंत्र्याचा क्षण असेल हा नेताजींचा ध्येयवाद होता.

मात्र यासाठी आपल्या देशवासियांना आझाद हिंद सेना ही आपली मुक्तिसेना व स्वतंत्र हिंदुस्थानचे भावी सेनादल आहे अशी भावना होणे अत्यावश्यक आहे असे नेताजींना वाटत होते. हे अत्यंत कठिण होते हेही त्यांना माहित होते. एकिकडे धूर्त इंग्रजांनी चालविलेला अपप्रचार -जे खोडसाळपणे आझास हिंद सेनेचा उल्लेख अत्यंत तुच्छतापूर्वक ’जिफ्स’ (जॅपनिज इन्स्पावर्ड फिफ्थ कॉलम्नीस्ट्स) असा करीत असत. ज्यायोगे असा प्रचार व्हावा की आझाद हिंद सेना हे जपान्यांचे हस्तक दल असुन ते जपानरूपी शत्रूला भारतावर आक्रमण करण्यास मदत करीत आहेत व त्यातुन त्यांना सत्तेची लालसा आहे, अर्थातच ही सेना नसून ते घरभेदी आहेत. दुसरीकडे प्रस्थापित नेत्यांनी व कॉंग्रेस पक्षानेही नेताजी व आझाद हिंद सेना यांना आपले म्हणण्यास नकार दिला होता व त्यांचा धिक्कारही केला होता, त्यांच्या भगिरथ प्रयत्नांची दखल घेण्यास नकार दिला होता व त्यांची नकारात्मक प्रतिमा साकारली होती. असे प्रयत्न आपल्या धोरणा विरुद्ध असून आपण त्यांना विरोधच करु असे धोरण कॉंग्रेसने स्विकारले होते.

प्रत्यक्ष आपल्या मातृभूमित ही परिस्थिती तर जगात आपल्या सेनेचे काय स्थान असेल? काय प्रतिमा असेल? आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामास जागतिक पाठिंबा मिळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे नेताजींनी अभ्यासले होते. इतकेच नव्हे तर आपण व आपले सेनादल हे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असून या प्रयत्नात सर्व स्वातंत्र्यवादी अशियाई राष्ट्रे तसेच पाश्चिमात्य राष्ट्रे यांनी एक स्वातंत्र्योन्मुख राष्ट्र म्हणुन आपल्या मागे उभे राहिले पाहिजे ही नेताजींची महत्त्वाकांक्षा होती. एखाद्या व्यक्तिला वा संघटनेला पाठिंबा देणे वा व्यक्तिश: मदत करणे आणि युद्धात एखाद्या राष्ट्राने न्याय्य वाटणाऱ्या राष्ट्राची बाजु घेणे यांत जमीन -अस्मानाचा फरक होता. मुळात जेव्हा एखाद्या देशाचे सैन्य स्वत:चा संग्राम उभा करते आणि समविचारी राष्ट्रे त्याला पाठिंबा देतात तेव्हा ते संकेताला अनुसरुन असते मात्र एखाद्या गटाला वा व्यक्तिधिष्ठीत संघटनेला सहाय्य करणे ही अन्य राष्ट्राची कुरापत वा हस्तक्षेप ठरू शकतो. आझाद हिंद सेना म्हणजे कुणी व्यक्तिगत लाभासाठी वा आपल्या हेक्यासाठी उभारलेली मोहिम नव्हती तर ती एका संग्रामस्थ राष्ट्राची अस्मिता होती. आणि म्हणुनच तिला वा तिच्या पाठीराख्या मित्रराष्ट्रांना नेताजी बदनाम होऊ देणार नव्हते, तर ते आपला संग्राम युद्धनितीला व संकेताला अनुसरून आपला व आपल्या राष्ट्राचा हक्क मिळविण्यासाठी न्याय्य मार्गाने लढणार होते.

ज्या कारणास्तव शिवरायांनी राजमुकुटाची यत्किंचितही आसक्ती नसताना रायगडावर स्वत: ला राज्याभिषेक करवुन घेतला आणि स्वराज्य स्थापनेची घोषणा केली, नेमक्या त्याच उद्देशाने नेताजींना आझाद हिंद चे हंगामी सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला. इथे पुन्हा एकदा नेताजींवरील शिवचरित्राचा प्रभाव दिसुन येतो. आपले लष्कर म्हणजे कुणा लुटारूंची टोळी नव्हे, कुणा सत्ताबुभुक्षिताची फौज नव्हे, कुणी अत्याचारी जमाव नव्हे तर हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी वचनबद्ध आणि धेयासक्त असलेले देशभक्त संघटित होऊन व स्वत:च्या भावी स्वतंत्र राष्ट्राचे प्रातिनिधीक असे सरकार स्थापून साऱ्या जगाला ग्वाही देणार होते की आम्ही आमच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या राष्ट्रध्वजाखाली आमच्या सेनानीच्या अधिपत्याखाली उपलब्ध त्या सर्व मार्गांनी आणि सहकार्यानी लढणार आहोत आणि हा संघर्ष आता स्वातंत्र्यप्राप्तीतच विलिन होईल. आता कुणी आम्हाला गद्दार, फितुर, लोभी, भ्याड वा परक्यांचे हस्तक म्हणु शकणार नाही कारण आता आम्ही स्वतंत्र हिंदुस्थानचे सरकार स्थापन करीत असून जे आमच्या बरोबर येत आहेत ते आमच्या राष्ट्राला मान्यता देऊन व आमच्या स्वातंत्र्याचा आदर राखुन आम्हाला मित्र राष्ट्र म्हणुन आम्हाला पाठिंबा देत आहेत, मात्र स्वातंत्र्य हे आमचेच असेल व त्यासाठी जेव्हा जेव्हा रक्तपात होइल तेव्हा सर्वप्रथम रक्त आमचे सांडेल!

दिनांक २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूरात नेताजींनी
आझाद हिंदच्या हंगामी वा अस्थायी सरकारची घोषणा केली.

AZH announcement

नेताजींचा इतिहासाचा उत्तम अभ्यास होता इतकेच नव्हे तर भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांची संगती ते वर्तमान परिस्थितीशी ते अचूक साधत असत. हे अस्थायी सरकार स्थापन करताना त्यांच्या डोळ्यापुढे जागतिक इतिहासातील १९१६ सालचे आयरीश स्वातंत्र्यवीरांनी स्थापन केलेल अस्थायी सरकार, झेक अस्थायी सरकार तसेच केमाल पाशाने अनातोलियात स्थापन केलेले हंगामी सरकार ही नक्कीच असावीत. या प्रसंगी जमलेल्या १००० हून अधिक प्रतिनिधींना या सरकारचे स्वरूप समजावताना नेताजींनी सांगीतले की युद्धकाळात स्थापन झालेल्या या सरकारचा कारभार शांततेच्या काळातील सामान्य सरकारपेक्षा फार वेगेळा असेल, त्याची कार्यपद्धती निराळी असेल कारण ते शत्रुविरुद्ध लढणारे सरकार आहे. या सरकारला मंत्रीमंडळाखेरीज अनेक सल्लागार असतील जे पूर्व अशियातील हिंदुस्थानियांच्या सातत्याने संपर्कात असतील. जेव्हा हे सरकार स्वतंत्र हिंदुस्थानच्या भूमित स्थलांतरीत होईल तेव्हा ते नेहेमीची कामे करू लागेल. या सरकारच्या मंत्रीमंडळाला लाल दिव्याच्या गाड्या नी मानसन्मान नव्हते तर स्वराज्य स्थापनेची जबाबदारी होती. संग्रामाला सुरुवात तर झालीच आहे, आता प्रत्यक्ष युद्धभूमिकडे जेव्हा आझाद हिंद सेना कूच करेल तेव्हा प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होईल. युद्ध जिंकुन, इंग्रज व अमेरीकन फौजांना धूळ चारून जेव्हा व्हॉईसरॉयला हुसकून त्याच्या भवनावर तिरंगा फडकेल तेव्हाच हा लढा थांबेल.

आझाद हिंदच्या हंगामी सरकारचे मंत्रीमंडळ

AHministry

नेताजी हे स्वत: या सरकारच्या सर्वोच्चपदी म्हणजे पंतप्रधान व राष्ट्रप्रमुख होते. युद्ध व परराष्ट्र व्यवहार ही दोन खाती त्यांच्याकडे होती.अर्थातच स्वातंत्र्यपर्वाचे भिष्माचार्य राशबाबू हे या सरकारच्या सर्वोच्च सलागारपदी असावेत अशी गळ नेताजींनी त्यांना जाहिर रित्या घातली व राशबाबूंनी ती मान्य केली. लेफ्टनंट कर्नल ए. सी. चटर्जी हे अर्थमंत्री होते, आनंद मोहन सहाय यांना मंत्रीपद दिले गेले. एस. ए. अय्यर यांच्याकडे प्रसिद्धी व प्रचारयंत्रणेची जबाबदारी होती, कॅप्टन लक्ष्मी यांच्याकडे स्त्री संघटनाची जबाबदारी होती, ए. एन. सरकार हे कायदेसलागार होते, जगन्नाथराव भोसले, निरंजन भगत, अझिज अहमद, मोहम्मद झमन कियाणी, ए. डी. लोगनादन, एहसान कादिर व शाहनवाझ खान हे लष्कराचे प्रतिनिधी होते तर करीम गनी, देबनाथ दास, यल्लाप्पा, जॉन थिवी, सरदार इशरसिंग हे सल्लागार होते. राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान म्हणुन शपथ ग्रहण करताना नेताजींचा कंठ दाटुन आला. काही क्षण त्यांच्या तोंडुन शब्दच फुटेना.मग स्वत:ला सावरून त्यांनी शपथ घेतली "परमेश्वराला स्मरुन मी सुभाषचंद्र बोस, भारताला आणि माझ्या ३८ कोटी बांधवांना स्वतंत्र करण्यासाठीही पवित्र प्रतिज्ञा करीत आहे. शेवटचा श्वास घेईपर्यंत हे पुण्यदायी युद्ध मी सुरूच ठेवेन." टाळ्यांच्या कडकडाटात व त्या भारलेल्या वातावरणात सर्व मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. सोहळ्याची सांगता झाली ती नव्या राष्ट्रगीताने:

सब सुखकी चैनकी बरखा बरसे भारत भाग है जागा
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल बंगा
चंचल सागर बिंध हिमाला, नीला जमुना गंगा
सूरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा, जय हो जय हो, जय हो !

सबके दिलमे प्रीत बसाये तेरी मिठी बानी
हर सुबेके हर मजहबके रहनेवाले प्राणी
सब भेद-औ-फर्क मिटाके,
सब गोदमे तेरी आके,,
गूंदे प्रेम की माला
सूरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा, जय हो जय हो, जय हो !

सुबह सबेरे प्रेम पंखेरू तेरेही गुन गाये
बासभरी भरपूर हवाएं जीवन मे रूत लायें
सबमिल कर हिंद पुकारे,
जय आझाद हिंदके नारे,
प्यारा देश हमारा
सूरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा, जय हो जय हो, जय हो !

( हे गीत गाताना स्वतंत्र हिंदुस्थानात कंठाकंठातुन हे गीत गायले जात असेल असे स्वप्न पाहणाऱ्या नेताजींना कल्पना नव्हती की काही दशकांनंतर हे गीत कुठे ऐकायलाही मिळणार नाही, कुणाला माहितही असणार नाही.)


ina stamp sgp

स्वतंत्र देशाचे सरकार म्हणजे स्वतःचे चलन व टपाल तिकिट हे हवेच!

INA 5 re noteINA 10 re noteINA 100 Re note

रुपये ५०० मूल्याचे राष्ट्रिय प्रमाणपत्र हे
जणू आझाद हिंदचे स्थैर्य व यशाची ग्वाही देत होते

INA certificate 500 re

जशास तसे

आझाद हिंद सेने विषयी अपप्रचार करून इंग्रजी सैन्यातील हिंदुस्थानी शिपायांना आझाद हिंदमध्ये सामिल होण्यापासून परावृत्त करण्यासाठी इंग्रजांनी सैन्यात अनेक पत्रके वाटली होती. त्याला चोख प्रत्त्युत्तर म्हणून आझाद हिंद सरकारने हिंदी शिपायांना सत्यस्थिती समजावी व त्यांनी आझाद हिंद सेनेत दाखल व्हावे यासाठी अशी पत्रके वितरीत केली. यात आझाद हिंद सेना गुलामीचे साखळदंड तोडत आहे व आता इंग्रजांचा झेंडा जमिनीला मिळाला आहे, जपानी लष्कराच्या मदतीने आझाद हिंदच्या वीरांची घोडदौड सुरू आहे असे या पत्रकांत प्रभावीपणे दाखविण्यात आले होते.

IndiaBose-AzadHindCard