आजकाल केवळ एका इयत्तेतून दुसर्या इयत्तेत जाण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, त्याला ‘अभ्यास’ म्हटले जाते. असा अभ्यास ही केवळ परीक्षेची सिद्धता (तयारी) असते; कारण परीक्षा झाल्यावर कालांतराने त्या विषयाशी संबंधित काही प्रश्न विचारल्यास मुलांना उत्तरे देता येत नाहीत. यामुळे ‘विद्यार्थी’ बनण्यापेक्षा मुले नकळतपणे ‘परीक्षार्थी’ बनतात.
अ. मुलांनो, केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे, हे तुमचे ध्येय नसावे, तर मिळवलेल्या विद्येतून (ज्ञानातून) मोठेपणी विद्यादान करता यावे, मिळवलेली विद्या राष्ट्राच्या उपयोगी पडावी, असे अभ्यास करण्यामागचे तुमचे उद्देश असावेत. राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, तसेच धर्मासाठी जीवन वेचणारे स्वामी विवेकानंद यांची चरित्रे अभ्यासल्यास हे लक्षात येईल.
आ. एखाद्या विषयाचा अभ्यास करणे, म्हणजे केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्या विषयाचे वाचन करणे, असे नसून तो विषय समजून घेऊन स्वतः कृतीत आणणे होय. पुढील दोन उदाहरणांवरून हे अधिक लक्षात येईल.
नागरिकशास्त्रात सांगितलेले असते की, डाव्या अंगाने (बाजूने) वाहन चालवावे. प्रत्यक्ष जीवनातही तुम्ही सायकल नेहमीच डाव्या अंगाने चालवली पाहिजे.
विज्ञान सांगते, ‘उघड्यावरचे अन्नपदार्थ प्रकृतीला हानीकारक असतात.’ सहलीला गेल्यावरही या ज्ञानाची आठवण ठेवावी आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.