‘अमर चित्रकथाकारा’ची ‘अमर’कथा !


१९७० च्या दशकापासून आजपर्यंत ‘अमर चित्रकथे’च्या माध्यमातून बालपिढीचे भावविश्व समृद्ध करणारे अनंत पै यांची २४ फेब्रुवारीला पहिली पुण्यतिथी झाली, तेव्हा अनेकांना डोळ्यांसमोर स्वतःचे बालपण तरळले ! पौराणिक आणि ऐतिहासिक कथांचा समुच्चय असलेल्या त्यांच्या चित्रकथांनी गेल्या दोन पिढ्यांचे बालपण केवळ संस्कारित केले नाही, तर अक्षरशः पछाडून टाकले होते ! ‘अमर चित्रकथां’तील महाल, राजवाडे, त्यातील हंड्या-झुंबरे, घोडे, सैन्य, प्रांता-प्रांतांनुसार पालटणारे महाराज-महाराणींचे पोशाख, अलंकार, सामान्य माणसांचे कपडे, देवदेवता, अप्सरा, लढाई, गावांची दृश्य, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला ते दृश्य इत्यादी चित्रांनी प्रचंड भुरळ पाडली होती आणि ती आजही पाडतात, हेच त्यांचे निर्विवाद वैशिष्ट्य !


अनंत पै हे मुळात ‘यु.डी.सी.टी.’सारख्या उच्च शिक्षणसंस्थेतून पदवी घेतलेले रसायन क्षेत्रातील अभियंते (केमिकल इंजिनीअर); पण त्यांना पुस्तके आणि प्रकाशन या गोष्टींचे आकर्षण होते. म्हणूनच अभियंते होऊनही ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘बुक डिव्हिजन’मध्ये दाखल झाले. याच सुमारास, म्हणजे १९६७ मध्ये ते एकदा दिल्लीत फिरत असतांना त्यांनी एका दुकानात दूरचित्रवाहिनीवर एक प्रश्नमंजुषा (‘क्विझ कॉम्पिटिशन’) चालू असलेली पाहिली. त्यांनी पाहिले की, त्या प्रश्नमंजुषेत भाग घेणारी भारतीय मुले ग्रीक आणि रोमन संस्कृतीशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे सहजगत्या देत आहेत; पण भारतीय पुराणांशी संबंधित प्रश्नांवर त्यांची दांडी उडत आहे. हे पाहून पै अस्वस्थ झाले. त्यातूनच त्यांना भारतीय पुराणे आणि इतिहास यांच्याशी संबंधित कथा चित्रकथांच्या (कॉमिक्सच्या) रूपात सादर कराव्यात, अशी अभिनव कल्पना सुचली. त्यासाठी ते अनेकांना भेटले. अनेक प्रकाशन संस्थांची द्वारे त्यांनी ठोठावली. शेवटी ‘इंडिया बूक हाऊस’ने ही कल्पना उचलून धरली. पहिली अमर चित्रकथा ‘कृष्ण’ ही स्वतः अनंत पै यांनी लिहिली होती. या पहिल्यावाहिल्या ‘अमर चित्रकथे’चे श्रेय त्यांना मिळाले; पण मानधन नाही; कारण पै यांनी मुलांना भावतील, अशा कथा व्यवस्थितपणे लिहिता येत नाहीत, तोपर्यंत वेतन घ्यायचे नाही, असे ठरवले होते. ते स्वतः कथा लिहायचे, चित्र काढायचे आणि अंक प्रसिद्ध झाल्यावर शाळा-महाविद्यालये आणि ग्रंथालये येथे जाऊन त्यांची विक्री करायचे ! अशा तर्‍हेने त्यांनी ‘अमर चित्रकथां’चा पाया रचला ! आजवर पहिल्या ‘कृष्ण’च्या अकरा लाखांहून अधिख प्रती खपल्या आहेत. त्यांनी ४० वर्षांमध्ये पुराणे, इतिहास, रामायण, महाभारताचे ४२ भाग, जातककथा, पंचतंत्र, हितोपदेश, भागवत पुराणाचे पाच भाग, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि क्रांतीकारक अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील ४३६ मथळ्यांखाली कथा लिहिल्या. हा आकडा पुरेसा बोलका आहे.


मुलांपर्यंत इतिहास पोहोचवण्याचे अनंत पै यांचे प्रयत्न निश्चितच प्रामाणिक होते. त्यांनी निवडलेल्या चित्रकथांच्या माध्यमाला अनेक मर्यादा होत्या. असे असतांनाही ‘अमर चित्रकथां’नी ज्या थराचा नेमकेपणा दाखवला आणि ज्या थराला त्या मुलांपर्यंत पोहोचल्या, तो एक चमत्कारच होता. ‘मुलांना एकंदरच इतिहास शिकण्यात फारसा रस नसतो; पण ‘अमर चित्रकथां’नी गुंतागुंतीची पुराणे आणि इतिहासातील क्लिष्ट तपशील मुलांसाठी सुगम अन् अतिशय रंजक केले आहेत. त्यामुळे ‘अमर चित्रकथा’ हे एक उत्कृष्ट शिक्षण माध्यम आहेत’, असे अमेरिकी प्राध्यापिका ‘कार्लाईन मॅकलीन’ यांनी लिहून ठेवले आहे. या अमेरिकी प्राध्यापिकेने ‘अमर चित्रकथा’ या विषयावर ‘बकनेल युनिव्हर्सिटी’ची डॉक्टरेट मिळवली आहे. जर्मनीतील ‘वुर्झबर्ग युनिव्हर्सिटी’तील ‘नॉर्बर्ट बार्थ’ हाही ‘अमर चित्रकथां’वर ‘पी.एच्.डी.’ करतो आहे. हे सर्व सांगायचे तात्पर्य, भारतातच नव्हे, तर विदेशातही ‘अमर चित्रकथां’नी वेड लावले आणि भारतीय पुराणे अन् इतिहास जगापर्यंत पोहोचवला ! त्यामुळेच ‘मीडिया अ‍ॅण्ड ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ रिलिजन इन साऊथ एशिया’ (संपादक लॉरेन्स बाब, सुझन वेडली; युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया प्रेस; १९७५) या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर ‘अमर चित्रकथे’त झळकलेले संत मीराबाई यांचे चित्र आहे, ही येथे आवर्जून सांगण्याची गोष्ट !


मुलांना सांगण्यासाठी गोष्टी निवडतांना पुष्कळ भान ठेवावे लागते, हे ध्यानात घेऊन त्यांनी काही विवादास्पद बाबी मुद्दाम टाळल्या होत्या. काहींच्या संदर्भात त्यांनी मूळ कथेची तोडमोड न करता ती सौम्यपणे मांडली. ‘अमर चित्रकथे’च्या ‘रामायण’ अंकातील ‘सीतेच्या अग्नीप्रवेशाचे चित्र’ आजही डोळ्यांसमोर उभे रहाते. एक चित्र १ सहस्र शब्द बोलून जाते, याची जाणीव अनंत पै यांना होती; म्हणूनच ते चित्र ‘पेटलेला अग्नी आणि त्याच्यासमोर हात जोडून उभी असणारी सीता’ अशा स्वरूपात रेखाटण्यात आले होते. त्यातून अर्थबोधही झाला आणि हिंसक कृती टाळली गेली.

‘अमर चित्रकथां’च्या माध्यमांतून बालकांसाठी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे मुलांचे लाडके ‘अंकल पै’ झालेले अनंत पै यांची २४ फेब्रुवारी २०११ या दिवशी प्राणज्योत मावळली, तरी ते ‘अमर चित्रकथां’च्या माध्यमांतून अजरामर झाले ! त्यांनी केलेले ‘अमर ज्योती’सारखे कार्य पुढे कधी तरी सविस्तररित्या पहाता येईल; कारण तो आजच्या अग्रलेखाचा विषय नाही. अनंत पै यांच्या जीवनकार्याची ओळख व्हावी, हा या अग्रलेखाचा एकमेव उद्देश आहे. पै यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना ही शब्दरूपी आदरांजली !


संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment