प.पू. गोंदवलेकर महाराजांचे आज्ञापालन

एकदा प.पू. गोंदवलेकर महाराज त्यांचे गुरु प.पू. तुकामाईंसमवेत नदीच्या किनार्‍यावर गेले होते. तेथे काही मुले वाळूत खेळत बसली होती. त्यांना बघून तुकामाई महाराजांनी प.पू. गोंदवलेकर महाराजांना एक मोठा खड्डा खणायला सांगितला. त्याप्रमाणे महाराजांनी खड्डा खणला. तुकामाईंनी त्यांना खेळत असलेल्या मुलांना त्यात टाकून तो खड्डा पुन्हा बुजवायला सांगितला. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे केले. तुकामाईंनी महाराजांना सांगितले, ‘‘तुला कोणी काही विचारले, तरी काही सांगायचे नाही आणि बोलायचेही नाही.’’

संध्याकाळ झाली, तरी मुले घरी आली नाही; म्हणून मुलांचे पालक त्यांना हुडकत नदीच्या काठावर आले. तेथे एका झाडाखाली प.पू. तुकामाईंना बसलेले बघून त्या लोकांनी त्यांना मुलांविषयी विचारले असता त्यांनी म्हटले, ‘‘तो बघा, तेथे समोर बसलेल्या मुलाने खड्डा खणून तुमच्या मुलांना त्यात पुरले, हे मी स्वतः बघितले आहे. आता कसा समाधी लाऊन बसला आहे बघा. त्याला मुलांविषयी विचारा आणि काही बोलला नाही, तर त्याला यथेच्छ मारा. त्याला बाजूला करून तुम्ही वाळू काढून बघा. तेथे तुमची मुले सापडतील.’’ त्या पालकांनी तुकामाईंनी सांगितल्याप्रमाणे केले. तेथे खड्ड्यात मुले बेशुद्धावस्थेत दिसताच त्या पालकांनी पुन्हा महाराजांना मारायला आरंभ केला. त्या वेळी तुकामाईंनी स्वतःच्या कमंडलूतील पाणी मुलांवर शिंपडताच मुले शुद्धीवर आली आणि आपल्या पालकांना जाऊन बिलगली. पालक प्रसन्न होऊन मुलांसह घरी गेले.

इकडे तुकामाईंनी महाराजांना मिठीत घेतले आणि त्यांना अनेक आशीर्वाद देऊन म्हटले, ‘‘ईश्वर याचे फळ नक्कीच तुला देईल.’’

तात्पर्य : महाराजांचे आज्ञापालन अनुकरणीय आहे. त्यांनी ‘का करू ?’, असे काही न विचारता गुर्वाज्ञापालन केले. त्यामुळे त्यांना गुरूंचे आशीर्वाद मिळाले आणि त्यांच्यावर श्रीरामाची भरभरून कृपा झाली.



Leave a Comment