पांडुरंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण करणे

तुकोबांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांना त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. श्रावण मासात तुकोबांच्या कीर्तन-श्रवणाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने शिवाजीराजे तुकोबांच्या राहात्या ठिकाणी आले. तुकोबांच्या दर्शनाने ते धन्य झाले आणि कीर्तन-श्रवणात दंग होऊन तेथेच ते तळ ठोकून राहिले. ही वार्ता चाकणात यवनी सेनापतीला समजताच शिवाजीराजांना धरण्यासाठी किंवा मारण्यासाठी त्याने दोन सहस्र पठाणांची सेना पाठवली. हे वृत्त शिवाजीराजांना कळले, तेव्हा ते कीर्तनास बसले होते. शिवबांनी लगबगीने तुकोबांची आज्ञा मागितली, तेव्हा तुकोबांस अतिशय दुःख झाले. आपल्या कीर्तनात असे विघ्न आलेले पाहून त्यांना मरणप्राय वेदना झाल्या. त्यांनी आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी पांडुरंगाचा धावा चालू केला. तेव्हा पांडुरंगाने अभय दिले.

चमत्कार काय घडला, यवन सेनेला तुकोबांच्या कीर्तनात बसलेले सर्व श्रोते शिवजीराजांसारखेच दिसू लागले. तेव्हा सर्व श्रोत्यांचा संहार करण्याचे त्याने ठरवले; पण तेवढ्यात शिवबांचे रूप घेऊन पांडुरंग तेथून बाहेर पडले, तेव्हा यवन सेनेतील हेरांनी तोच शिवाजी असल्याचे सेनापतीस सांगितले. सर्व पठाण सैन्य सेनापतीसह पाठीशी आणि शिवाजीरूपी पांडुरंग पुढे अशी स्पर्धा लागली. शिवबारूपी पांडुरंगानी पठाण सैन्यास हुलकावणी देत चकवत २० कोस दूर नेले आणि दाट अरण्यात काट्याकुट्यात सूर्यास्ताच्या वेळी सकळ सैन्यास अडकवून ते गुप्त झाले. काटेकुटे लागून रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत यवनी सैन्याचे कपडे आणि कातडी फाटून अंधारात वाट चुकून ते भटकू लागले; पण शिवबा (शिवबारूपी पांडुरंग) त्यांच्या हाती लागले नाही.

इकडे तुकोबांच्या कीर्तनात शिवबा आनंद उपभोगत पहाटेपर्यंत बसून राहिले. आरती झाल्यावर प्रसाद आणि तुकोबांचे आशीर्वाद घेऊन सुरक्षितपणे सिंहगडावर पोहोचले.

तात्पर्य : संत तुकारामांनी स्वतःची बायाको-मुले उपाशी असतांना पांडुरंगाचा कधीही धावा केला नाही; पण क्षात्रधर्माचे प्रतिरूप असलेल्या छ. शिवाजी महाराजांचे रक्षण करण्यासाठी आयुष्यात एकदाच आणि शेवटचा धावा केला; कारण त्यांना ठाऊक होते की, शिवाजी महाराजच हिंदवी राज्याची स्थापना करू शकतात.

Leave a Comment