नामा नावाचा एक कोळी होता. तो आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी वाटसरूंना मारत असे. त्यात ब्राह्मण, बायका, मुले, तसेच प्राणी या सर्वांचाच समावेश होता. ही त्याची दिनचर्या होती. समोरून एखादी व्यक्ती पिशवी अथवा गाठोडे घेऊन येत असेल, तर त्याला लुटून त्याची हत्या करणे हे त्याला फार आवडत असे.
एक दिवस समोरून मुद्गल ऋषी हातात कुबडी आणि कमंडलू घेऊन येत असतांना त्याला दिसले. तो आपली कुर्हाड घेऊन त्यांना मारण्यासाठी पुढे सरसावला; परंतु त्याने हात उगारताक्षणी कुर्हाड मागच्या मागे गळून पडली, असे तीन वेळा झाले. मुद्गल ऋषी त्याला म्हणाले, ‘‘अरे, मला मार ना ! तुझी कुर्हाड का पडली ?’’ हे ऐकून त्याला फार राग आला. त्याने वाकून पुन्हा कुर्हाड उचलून मारण्यासाठी उगारली; पण या वेळीही तसेच घडले. त्याने ऋषींच्या चरणांवर डोके ठेवले आणि म्हणाला, ‘‘महाराज, आजपर्यंत असे कधीही घडले नाही. मला क्षमा करा.’’ त्यावर ऋषी म्हणाले, ‘‘अरे, या हत्या तू का करत आहेस ? यांची पापे तू कुठे फेडणार ?’’ त्यावर तो उत्तरला, ‘‘महाराज माझे आई-वडील, बायका-मुले हे सर्वच माझ्या पापांचे भागीदार होतील.’’ त्याचे उत्तर ऐकून ऋषींनी त्याला कुटुंबियांना हे विचारण्यास पाठवले.
त्या वेळी त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या पापांचे भागीदार होण्यास नकार दिला. ‘आमचे पोट भरणे’, हे तुझे कर्तव्यच आहे. तू कसे भरतो ? काय करतोस ? याचा आमचा काही संबंध नाही’, हे ऐकून त्याला आश्चर्य आणि वाईट वाटले. त्याने परतपाऊली येऊन ऋषींच्या चरणांवर लोटांगण घातले. या पापांपासून मुक्त होण्यासाठी मला मार्ग दाखवा. तेव्हा ऋषींनी समोरच्या कुंडात स्नान करून येण्यास सांगितले. त्यांनी आपल्या हातातली काठी (सुका बांबू) भूमीत रोवून त्याला त्या काठीसमोर बसून ‘श्री गणेशाय नमः ।’ असा जप करण्यास सांगितले. त्यांनी त्याला म्हटले, ‘‘जेव्हा या काठीला वृक्षाचे रूप येऊन ते हिरवेगार होईल, त्या वेळी तुझ्या पापांचा नाश झालेला असेल.’’ एवढे सांगून ऋषी निघून गेले.
नामाकोळ्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे काठीवर दृष्टी ठेवून नामजप करण्यास आरंभ केला. सहस्रो वर्षांनी त्या ठिकाणी सुंदर वन सिद्ध झाले. त्या काठीला हिरव्यागार वृक्षाचे रूप आले होते. तेव्हा एकदा मुद्गल ऋषी विहार करत असतांना त्यांचे लक्ष या वनाकडे गेले. तेथे सर्व हिंस्त्र पशू आपापसात प्रेमाने खेळत असलेले त्यांनी पाहिले. हे बघून त्यांना आश्चर्य वाटले. योगबळावर त्यांनी भूतकाळात जाऊन बघितल्यावर त्यांना तो नामाकोळी आठवला. त्या वृक्षाखाली त्यांनी मोठे वारुळ बघितले. त्यांना समोर दोन चकाकणारी छिद्रे दिसली आणि त्या छिद्रातून दिव्य प्रकाश बाहेर पडत असतांना दिसला. वारुळातून ‘श्री गणेशाय नमः ।’ असा जप त्यांना ऐकू आला. त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी त्या वारुळावर शिंपडताच वारुळ बाजूला होऊन तेथे त्यांना हाडांचा सापळा दिसला. त्या सापळ्यावर त्यांनी पुन्हा कमंडलूतील पाणी शिंपडले. तेव्हा त्यांना त्या नामाकोळ्याची आठवण होऊन गहिवरून आले; कारण त्याला सोंड फुटली होती. त्यांनी त्या नामाकोळ्याला कडकडून मिठीत घेतले आणि म्हटले, ‘‘आजपासून लोक तुला ‘भृशुंडी ऋषी’ या नावाने ओळखतील. कारण तुझ्या भ्रूमध्यातून सोंड फुटली आहे. श्री गणेशाने तुला आपले रूप दिले आहे.’’ ऋषी त्याला म्हणाले, ‘‘अरे, मी ज्या श्री गणेशाची सातत्याने भक्ती करत आहे, त्याचे मला अजून दर्शनही झाले नाही; पण तुझ्या नामभक्तीला प्रसन्न होऊन श्री गणेशाने तुला आपले रूप दिले. ‘ब्रह्मांडात तू अजरामर होशील’’, असा आशीर्वाद देऊन ऋषी अंतर्धान पावले.
तात्पर्य : नामाचा महिमा असा आहे की, त्यासमोर कोणतेही पाप टिकत नाही; पण मी नामस्मरण करतो; म्हणून कोणतेही पाप करू शकतो, कुठलेही वाईट कर्म करू शकतो, असा त्याचा अर्थ होत नाही. पापाचे निराकरण करण्यातच नाम खर्ची पडते. नामाकोळ्याप्रमाणे आपणही नामजप करून आपल्या मनुष्यजन्माचा उद्धार करून घेऊ शकतो. मुलांनो आतापासून नामजप करणार ना ?