आनंदायी गुरुकुल शिक्षणपद्धती भारतात आणण्यासाठी कटिबद्ध व्हा !

गुरुकुल पद्धतीच आवश्यक

‘समाजात पैसा देऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी त्यानंतर नागरिक होऊन आपला व्यवसाय सचोटीने न करता, त्यातून अर्थार्जनाचाच विचार प्राधान्याने करून कार्य करतात. त्यांत त्यांना आत्मीयता रहात नाही, तर आपला अप्पलपोटेपणा साधून ‘आपण व आपले कुटुंब कसे ऐश्वर्यात, आरामात राहू शकेल’, हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश असतो. एखादा विद्यार्थी राजकारणात गेला, तर तेथेही समाजकल्याण बाजूला ठेवून भ्रष्टाचाराद्वारे संपत्ती जमा करतो. त्यामुळे सामान्य जनताही होरपळून निघते.

म्हणूनच पूर्वी ऋषीमुनींनी आपल्या आश्रमातून विद्यार्थ्यांना सर्व दृष्टीने सामर्थ्यवान करणारे शिक्षण दिले. त्यामुळे तो आश्रमातून १२ वर्षांनंतर बाहेर पडल्यानंतर आत्माविश्वासाने जीवनाला सामोरा जात असे. जीवन ही कला आहे. जीवन सर्वतोपरी स्वयंपूर्णरित्या आनंद, सामर्थ्य व स्वावलंबीत्व यांनी कसे जगावे, हे त्याला त्या आश्रमात सांगितले गेले होते, नव्हे त्याच्याकडून तसा पाठ आणि प्रयोग करून घेण्यात आला होता.’

– प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ १०२)

गुरुकुल शिक्षणपद्धतच खर्‍या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचा आणि देशाचा विकास घडवून आणेल

भारतात पूर्वापार चालत आलेल्या गुरुकुलपद्धतीने विद्यादान केले जात असे. ब्रिटिश राजवटीत भारतियांना इंग्रजाळलेले करण्याच्या हेतूने लॉर्ड मेकॉलेने बुद्धीपुरस्सर कुचकामी अशीच शिक्षणपद्धती त्या काळी अमलात आणली. स्वातंत्र्य मिळाल्यावरही तीच शिक्षणपद्धती अजूनही चालूच ठेवण्यात आली आहे. आजच्या शिक्षणामुळे काळ्या कातडीचे बाबू लोक फक्त तयार होत आहेत. पदवीधर झालेल्या तरुणांना त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात केवळ पाच टक्केच उपयोग होतो. त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे व्यवसाय लगेचच करायला जमत नाही. त्यामुळे त्यांना अपयश येते व देशाच्या विकासावरही अनिष्ट परिणाम होतो. गुरुकुलपद्धतीने प्रत्येकाच्या गुणवत्तेनुसार व्यवसायाधिष्ठित शिक्षण प्रारंभापासूनच दिले गेले असते, तर तरुणांना व्यवसाय उत्तम प्रकारे करता येईल व देशाचा विकासही योग्यरीत्या होईल; म्हणून गुरुकुल शिक्षणपद्धतीचा नव्याने प्रारंभ केला पाहिजे.

(संस्कृती दर्शन : वैद्य सुविनय दामले, जिल्हा सिंधुदुर्ग.)

पुनःश्च हरिॐ

‘पाश्चिमात्यांच्या प्रभावाचा परिणाम लक्षात घेऊन पुन्हा गुरुकुले व ‘राष्ट्रीय शाळा’ स्थापन होत आहेत. त्यांनी पूर्वीची पद्धत आचरणात आणण्यास सुरुवात केली, तर जगात शांतता प्रस्थापित करून, समाजाला उन्नत बनवून, संपूर्ण सृष्टीला तिचे ऐश्वर्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य निर्माण करणारे खरे ज्ञानी तयार होतील, यात शंका नाही.’

विज्ञान हे चैतन्यरहित असल्याने ते विद्यार्थ्यांना पाट्याटाकूपणा शिकवते. हे पाट्याटाकूपण कंटाळा आणणारे असते, म्हणून अशा अभ्यासाचा विद्यार्थ्यांना ताण येतो, तर अध्यात्म मात्र नित्यनूतन आणि चैतन्यमय असल्याने ते भक्तांना, भाविकांना दररोज निराळ्या पद्धतीचा आनंद देते, जसे वाचनात आपण खोल खोल जाऊ तसा आनंद द्विगुणीत होत असल्याचे समाधान आपल्याला लाभते, म्हणूनच ‘संत-चरित्र वाचतांना त्याचा खूप कंटाळा आला आहे, हे कधी एकदा वाचून संपते आहे, असे झाले आहे’, अशी वाक्ये कोणाच्याच तोंडून बाहेर पडतांना दिसत नाहीत, याचे कारण म्हणजे संत-चरित्रातील चैतन्य आणि त्यातील संतांचे अनुभूतींचे प्रत्यक्ष बोल ! पूर्वी गुरुकुलात हिंदुधर्मविषयक आचार आणि विचार पद्धतींना, हिंदुधर्मातील शास्त्रशुद्ध प्रमाणांना आत्यंतिक महत्त्व देऊन देवतांच्या, ऋषींच्या कृपेने अध्ययन आणि अध्यापन केले जात असल्याने ते वातावरणच चैतन्याने आनंदीत झालेले असायचे.

मग, चला तर परत एकवार ‘आनंददायी गुरुकुलरूपी धर्मशिक्षणपद्धती’ भारतात आणण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि पुढील पिढ्यांना तरी चैतन्याचा आणि यातून मिळणार्‍या देवकृपेचा आनंद देण्यासाठी सज्ज होऊया !

सनातन संस्थेने रामनाथी आश्रम, गोवा, येथे अशाच एका गुरुकुलाची २६ जुलै २०१० या दिवशी स्थापना केली आहे.’

– सौ. अंजली गाडगीळ, रामनाथी, गोवा. (चैत्र पौर्णिमा, कलियुग वर्ष ५११३ (६.४.२०१२))

Leave a Comment