तक्षशिला विद्यापीठ : हिंदूंची छाती गर्वाने फुलवणार्‍या प्राचीन भारतीय विद्यापिठांपैकी एक !

तक्षशिला विद्यापीठ

         ‘भारतात प्राचीन काळापासून पुष्कळ मोठी विद्यापिठे अस्तित्वात होती. त्यातील तक्षशीला, नालंदा, विक्रमशिला, नागार्जुन, काशी, प्रतिष्ठान, उज्जयिनी, वल्लभी, कांची, मदुरा, अयोध्या ही विद्यापिठे प्रसिद्ध होती. यांपैकी तक्षशिला विद्यापीठ हे कालक्रमानुसार हे सर्वांत प्राचीन विद्यापीठ आहे. ख्रिस्ताब्द पूर्व ८०० ते खिस्ताब्द पूर्व ४०० या काळात तक्षशिला हे शहर सध्याच्या पाकमधील रावळपिंडी शहरापासून पश्चिमेला २० मैलावर वसले होते.

         प्राचीन गंधारचे, म्हणजे सध्याच्या अफगाणिस्तानचे ते राजधानीचे शहर होते. अरायन या ग्रीक इतिहासकाराच्या मतानुसार सिकंदरच्या वेळी हे शहर जास्त भरभराटीला आले होते. विद्यापिठाचा परिसर अतिशय भव्य, निसर्गरम्य होता. मोठमोठ्या इमारतींत १० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील, एवढी व्यवस्था होती. शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या या विद्यापिठात प्रवेश मिळवण्याकरता विद्यार्थ्यांची रीघ लागलेली असे. या विद्यार्थ्यांमध्ये भारतातील, तसेच पूर्वेकडे इंडोनेशिया, व्हिएतनाम, चीन, जपान, तर पश्चिमेकडे इराण, इराक ते ग्रीक आणि रोम पर्यंतचे विद्यार्थी येत असत आणि येथे ८ ते १० वर्षे राहून शिक्षण घेत. येथील अभ्यासक्रमात १८ शास्त्रे आणि १८ कलांचा अंतर्भाव होता. धर्म आणि तत्त्वज्ञान हे त्या काळचे महत्त्वाचे विषय होते. शिल्पकला आणि स्थापत्यकला यांचे तक्षशिलेत दिले जाणारे शिक्षण आजच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दिल्या जाणार्‍या विषयांशी मिळत-जुळते होते. तक्षशिलेला एवढे मोठे स्थान प्राप्त होण्याचे प्रमुख कारण म्हणजे या विद्यापिठाला लाभलेले विद्वान, निरलस आणि ऋषीतुल्य शिक्षक. या शिक्षकांची प्रशंसा तत्कालीन सिसरो, प्लिनीसारख्या पाश्चात्त्य पंडितांनी केलेली आहे. या विद्यापिठाला नावारूपास आणण्याचे काम चाणक्य ऊर्फ कौटिल्य यांनी केले होते. या विद्याकेंद्रावर इराणी, ग्रीक, शक, कुशाण, हूण यांसारख्या परकियांनी सतत आघात करून ख्रिस्ताब्द ५०० च्या सुमारास हे विद्यापीठ नष्ट केले.

संदर्भ : (दैनिक देशोन्नती, अकोला, ४.१२.२००५)

         मुलांनो, हा विद्यापिठांचा हा उज्ज्वल इतिहास जाणा ! पाश्चात्त्य शिक्षण म्हणजे उच्च आणि भारतीय धर्मशिक्षण हे तुच्छ’ हा तुमच्या मनातील न्यूनगंड फेकून द्या !

Leave a Comment