भविष्यात महान कार्य करण्याच्या हेतूने किशोरवयातच कष्टमय जीवन जगण्याची सवय करणारा सुभाष (सुभाषचंद्र बोस) !
‘एकदा हिवाळ्याच्या दिवसांत बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मध्यरात्री सुभाषची आई प्रभावतीदेवींना जाग येऊन सुभाषची चिंता वाटल्याने त्या त्याच्या खोलीत गेल्या. किशोरवयातील सुभाष पलंगावर न झोपता भूमीवर सतरंजी अंथरून झोपलेला पाहून त्यांना पुष्कळ दुःख झाले. त्यांनी सुभाषला जागे केले असता त्यांच्यात पुढील संवाद झाला.
आई : बेटा, तू भूमीवर का झोपला आहेस ? अशा थंडीने तू रुग्णाईत होशील.
सुभाष : आई, मी मोठा झाल्यावर मला मोठी कामे करावयाची आहेत. त्यामुळे मी कष्ट सहन करण्याची सवय करत आहे.
आई : मुला, मोठी कामे करण्यासाठी भूमीवर झोपणे आणि कष्ट सहन करणे आवश्यक आहे का ?
सुभाष (थोडे हसून) : हो आई, सुखा-समाधानात जगत असलेले मोठी कामे कशी करू शकतील ? आपले ऋषीमुनी तर जंगलात आश्रम बांधून रहात असत आणि भूमीवर झोपत असत; म्हणून ते महान ग्रंथ लिहू शकले. तुम्हीच सांगितले ना की, ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण हे सुद्धा विश्वामित्र अन् सांदीपनी ऋषींच्या आश्रमात कष्टमय जीवन जगत होते.’
भारताला दास्यत्वाच्या श्रृंखलांतून मुक्त करण्यासाठी प्राणपणाची सिद्धता असलेला बाल सुभाष (सुभाषचंद्र बोस) !
सुभाषबाबूंच्या जीवनावर त्यांच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक बेनीप्रसाद माधव (बाबूजी) यांचा पुष्कळ प्रभाव होता. त्यांनी सुभाषला कधीही काही विचारायचे असेल, तर स्वतःजवळ निःसंकोचपणे येण्याची अनुमती दिली होती. एक दिवस सुभाष आणि मुख्याध्यापक श्री. बेनीप्रसाद माधव (बाबूजी) यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद झाला.
सुभाष : बाबूजी, आपण इंग्रजांचे दास का आहोत ? आपण पूर्वीपासून नेहमीच त्यांच्या अधीन होतो का ? आणि आपण नेहमीच त्यांच्या अधीन रहाणार का ?
बाबूजी : मुला, भारताची स्थिती नेहमीच अशी नव्हती. आपण तर जगात सर्वांत पराक्रमी आणि महान होतो. आपला देश इतका श्रीमंत होता की, ‘भारतातून सोन्याचा धूर निघतो’, असे इतर देशही म्हणत असत. रोम, चीन आणि जपान या देशांतून लोक भारतात ज्ञानप्राप्तीसाठी येत असत. प्राचीन काळात भारत ‘विश्वगुरु’ म्हणून ओळखला जात असे.
सुभाष : मग आपला देश पारतंत्र्यात का गेला ?
बाबूजी : आपल्यातील भोळेपणा आणि आपापसांतील मतभेद यांचा विदेशी शक्तींनी अयोग्य लाभ घेऊन त्यांनी त्यांचे राज्य स्थापन केले.
सुभाष : मला या दास्यत्वाच्या बेड्या तोडून फेकून द्याव्याशा वाटतात.
बाबूजी : सुभाष, तुझा हा विचार पुष्कळ चांगला आहे; पण अजून तू वयाने लहान आहेस. तू शिकून मोठा झाल्यावर हा प्रयत्न अवश्य कर.
सुभाष : बाबूजी, भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी मी प्राणांची आहुती देण्यास सिद्ध आहे. तेव्हापासून सुभाष देशाला इंग्रजांच्या अधिपत्यातून मुक्त करण्यासाठी करायच्या उपाययोजनांविषयी विचार करत अनेक रात्री घालवत असे. त्याने इतिहास आणि संस्कृत यांचा अभ्यास करून अनेक संस्कृत सुभाषिते मुखोद्गत केली होती. बाबूजींकडून मिळालेल्या प्रेरणेची परिणती बाल सुभाषला ‘भारताचा गौरवशाली पुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस’ म्हणून घडवण्यात झाली.’
(‘गीता स्वाध्याय’, जानेवारी २०११)