गाईच्या उत्पत्तीची कथा शतपथ ब्राह्मण ग्रंथात पुढीलप्रमाणे सांगितली आहे. दक्ष प्रजापतीने प्राणिसृष्टी निर्माण केल्यानंतर थोडे अमृत प्राशन केले. त्या अमृताने तो संतुष्ट झाला. त्यावेळी त्याच्या नाकातून जो श्वास बाहेर पडला. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळला. त्या श्वासातून एक गाय जन्मास आली. सुंगधातून जन्मल्यामुळे दक्ष प्रजापतीने तिचे सुरभी असे नाव ठेवले. सुरभीपासून अनेक गाई जन्मास आल्या. त्यामुळे सुरभी ही संपूर्ण गोवंशाची माता, जननी ठरली.
सुरभीने एकदा तप आरंभिला. ब्रह्मदेव त्या तपाने प्रसन्न झाला. त्याने सुरभीला अमरत्व प्रदान केले. तसेच त्रैलोक्याच्या वर असलेला एक स्वर्गही तिला बहाल केला; जो स्वर्ग गोलोक या नावाने ओळखला जातो. सुरभी या गोलोकात नित्य निवास करते आणि तिच्या कन्या, सुकन्या भूलोकात पृथ्वीवर राहतात. या गोलोकाचा अधिपती गोविंद अर्थात भगवान श्रीकृष्ण हा आहे. सूरभी एकदा इंद्रदेवाच्या दारावर भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला गेली आणि पशुराज्याच्या विषयांची श्रीकृष्णाची सदिच्छा पाहून तिने त्यांना आपल्या गोलोकाचा इंद्र म्हणून निवडले. भगवान श्रीकृष्णाचे गोप्रेम सर्वत्र प्रसिद्धच आहे.
संदर्भ : गोसूक्ते, प्रा. विजय यंगलवार, नचिकेत प्रकाशन