बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
वंदनीय वन्दे मातरम् लिहिणारे थोर हिंदु बंकिमचंद्र चट्टोपाध्याय !
सर्व भारतियांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करणार्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जन्माला २७ जून २०१३ या दिवशी १७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी लिहिलले आणि सर्व भारतियांना वंदनीय असणारे वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताविषयी येथे जाणून घेऊया.
१. वन्दे मातरम् रचणार्या बंकिमचंद्रांचे लेखनकार्य !
१ अ. शासकीय चाकरीतही स्वतःचे लेखनकार्य चालू ठेवणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय!:बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (१८३८-१८९४) हे ख्रिस्ताब्द १८५७ मध्ये स्थापन झालेल्या कलकत्ता (सध्याचे कोलकाता) विद्यापिठाचे पहिले पदवीधर. कला शाखेत पदवीधर होताच उपदंडाधिकारी आणि पुढे ते उपजिल्हाधिकारी या पदापर्यंत पोहोचले. शासकीय चाकरीत हिंदी लोकांना मिळणारी वागणूक, स्थानांतर अशा सर्व परिस्थितीत त्यांचे लिखाण चालूच होते. ख्रिस्ताब्द १८५७ च्या उठावाचा कालखंड त्यांनी जवळून बघितला होता. ख्रिस्ताब्द १८६५ ला त्यांची पहिली कादंबरी दुर्गेशनंदिनी प्रकाशित झाली. त्यापाठोपाठ कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष, इंदिरा, चंद्रशेखर, अशा कादंबर्या बंगदर्शनमधून प्रकाशित होत गेल्या.
१ आ. वन्देमातरम्चा समावेश असलेल्या आनंदमठ कादंबरीचा जन्म ! :शासकीय चाकरीत असल्यामुळे त्यांना अनेक जुनी कागदपत्रे बघायला मिळत. ख्रिस्ताब्द १७६३ ते १७८० पर्यंतच्या काळात ढाका, उत्तर बंगाल, नेपाळ तराई, दिनाजपूर, रंगपूर आणि पूर्णिया या भागांत झालेल्या संन्याशांच्या बंडाविषयीच्या कागदपत्रांच्या आधारावर आनंदमठ कादंबरीचा जन्म झाला. ही कादंबरी ख्रिस्ताब्द १८८० ते १८८२ या त्यांच्या संपादकीय कालावधीत बंगदर्शनमधून क्रमशः प्रसिद्ध झाली अन् तिच्यात ख्रिस्ताब्द १८७५ मध्ये लिहिलेल्या वन्दे मातरम् गीताचा समावेश करण्यात आला.
२.वन्दे मातरम्चे स्फुरण आणि वाटचाल !
२ अ. बंकिमचंद्रांना दर्शन देणार्या भारतमातेला वाहिलेली शब्दसुमनांजली म्हणजे वन्दे मातरम् ! :वन्दे मातरम् हे गीत नोव्हेंबर १८७५ मध्ये रचले गेले, असे आता अनेक प्रमाणांवरून सिद्ध झाले आहे. आमार दुर्गोत्सव अन् एकटी गीत हे बंकिमचंद्रांचे दोन लेख अन् कमलाकान्तेर ऐसो ऐसो हा पूर्णचंद्र चट्टोपाध्याय यांचा लेख, या तीनही लेखांवरून ख्रिस्ताब्द १८७५ च्या दुर्गापूजेत अष्टमीच्या रात्री बंकिमचंद्रांना भारतमातेचे दर्शन झाले असावे. त्यांच्याच शब्दांत ते वाचण्यासारखे आहे. मी माझ्या तराफ्यावरून तरंगत चाललो होतो अन् क्षितिजाच्या टोकाला अती दूर लाटांच्या लोटाच्यावर मी पाहिले, ती मातृदेवतेची सुवर्णमूर्ती होती. होय, तीच माझी माता, माझी मातृभूमी. भूमीच्या रूपातली माता, पृथ्वीच्या रूपात असंख्य रत्नांनी अलंकृत. तिच्या रत्नखचित दशभूजा दशदिशांत विस्फारल्या होत्या. त्या दाही हातांत विविध शस्त्रास्त्रे विविध शक्तींच्या स्वरूपात लखलखत होती. तिच्या पदतळी शत्रू छिन्नभिन्न नि हीनदीन होऊन चिरडला गेला होता. तिचा शक्तीशाली सिंह तिच्या पायांजवळच शत्रूला ओढून खाली पाडतांना दिसत होता. अरिमर्दिनी, सिंहवाहिनी माते, तुला माझे वंदन असो ! वन्दे मातरम् !!
२ आ. मित्र-आप्तेष्टांनी काढलेले वन्देमातरम्च्या रचनेचे उणेदुणे दुर्लक्षून प्रत्येक देशवासियाच्या तोंडी हे गीत वेदमंत्राप्रमाणे असेल, असे सांगणारे द्रष्टे बंकिमचंद्र ! :मनाच्या अशा उन्नत भावावस्थेत बंकिमचंद्रांनी गीत लिहून पुरे केले खरे; पण त्या काळी तरी ते कुणाला विशेष आवडले नव्हते. बंकिमचंद्रांच्या घरी अनेक लेखकमित्र स्वतःच्या नवीन लेखनाविषयी चर्चा करावयास जमत. या गीतावर चांगलीच चर्चा झाली. कुणी म्हणाले, यात श्रुतीमाधुर्य नाही. तर कुणी म्हणाले, यातले व्याकरणही बिघडले आहे. सस्य शामलाम, भुजैधृत, द्वित्रिंशत्कोटीसारखे शब्द रसहानी करत आहेत. इतके चांगले गीत; पण अर्ध बंगाली आणि अर्ध संस्कृत भाषेत लिहून पार बिघडवून टाकले आहे. बंकिमचंद्र त्यांना एवढेच म्हणाले, तुम्हाला नसेल आवडले, तर वाचू नका. मला जे चांगले वाटले, तेच मी लिहिले आहे. लोकांना काय आवडेल, याचाच विचार करत मी लिखाण करू काय ?
त्याच सुमारास ते अन् त्यांचे वडील बंधू संजीबचंद्र हे बंगदर्शनचे संपादक होते. बंगदर्शनच्या ताज्या अंकाच्या जुळणीचे काम अंतिम टप्प्यात आले असता काही जागा रिकामी रहात होती. बंकिमचंद्रांच्या टेबलाच्या (पटलाच्या) खणातल्या कवितेची व्यवस्थापकांनी पानपूरक म्हणून मागणी केली. काहीसे नाराज होऊनच त्यांनी कविता द्यायला होकार दिला. एकदा त्यांच्या मुलीनेही सांगितले की, लोकांना हे गीत तितकेसे पसंत नाही. मलाही विशेष आवडलेले नाही. ते म्हणाले, ही कविता चांगली आहे कि वाईट ते आता कळणार नाही; पण काही काळानंतर तिचे महत्त्व लोकांना कळेल. त्या वेळी मी कदाचित जिवंत नसेन; पण तुम्ही मात्र असाल. एक दिवस असा येईल की, सगळा देश आणि देशवासीय यांच्या तोंडी हे गीत वेदमंत्रासारखे असेल.
२ इ. धार्मिक संकल्पनांना देशभक्ती, मांगल्य आणि मातृपूजा यांची भावना जोडणारा एक महान मंत्र वन्दे मातरम् ! : खरोखरी तसेच व्हायचे होते. वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी १४-१५ कादंबर्या, गद्य लेखनाचे काही ग्रंथ, कविता संग्रह आणि वन्दे मातरम् हा महामंत्र भारतवासियांसाठी ठेवून बंकिमचंद्र काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या हयातीत गीताला चाल लावणे, स्वरलेखन करणे अशा गोष्टी झाल्या खर्या; पण खर्या अर्थाने ख्रिस्ताब्द १८९६ साली कलकत्ता (सध्याचे कोलकाता) येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात ते लोकांपुढे आले. खुल्या अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी ते गायले; पण त्याहीनंतर ९ वर्षांनी बंगालच्या फाळणीच्या वेळी ते जनमानसात रुजायला आरंभ झाला. प्रशासकीय सुविधेसाठी केलेली फाळणी इतकी महाग पडेल, असे लॉर्ड कर्झनलाही त्या वेळी वाटले नसावे. ख्रिस्ताब्द १९०७ मध्ये अरविन्द घोषांनी लिहिले, गाढ निद्रावस्थेत जागरणाच्या क्षणी बंगालच्या लोकांनी सत्यासाठी इकडे-तिकडे पाहिले, याच मंगलक्षणी कुणीतरी वन्दे मातरम् म्हटले. मंत्र दिला गेला आणि एका दिवसात संपूर्ण राष्ट्र देशभक्ती या धर्माचे अनुयायी बनले. उत्तिष्ठ, जाग्रत (उठा, जागे व्हा !) असा संदेश वन्दे मातरम्ने दिला. धार्मिक संकल्पनांना देशभक्तीची, मांगल्याची आणि मातृपूजेची भावना जोडत एक महान मंत्र बंकिमचंद्रांनी राष्ट्राला दिला.
३. भारतियांना स्फूर्ती देणार्या वन्दे मातरम् वर बंदी घालणारे ब्रिटीश शासन !
वन्दे मातरम् हे शब्द केवळ बंगाल्यांच्या ओठावरच नव्हे, तर बांगड्यांच्या नक्षीमध्ये, सदरे आणि साड्यांच्या किनारीवरती अन् काडीपेट्यांच्या वेष्टनावरतीही दिसू लागले. राष्ट्रीय गीत म्हणून सर्वत्र हे गीत गायले जाऊ लागले. त्याची वाढती लोकप्रियता पाहून ख्रिस्ताब्द १९०८ च्या सुमारास ब्रिटिशांनी त्याच्या गायनाला बंदी आणली. विशेष म्हणजे याच ब्रिटिश आणि फ्रेंच ग्रामोफोनच्या आस्थापनांनी (कंपनीने) आणि त्यांच्या दलालांनी या गिताचे महत्त्व आणि लोकप्रियता ओळखून ग्रामोफोन ध्वनीमुद्रिका (रेकॉर्डस्) बनवायला आरंभ केला. आरक्षकांनी धाडी घालून या आस्थापनांची बरीच सामग्री नष्ट केली. दुर्दैवाने या आरंभीच्या काळातील ध्वनीमुद्रण रवींद्रनाथांच्या ध्वनीमुद्रिकांचा (रेकॉडर्सचा) अपवाद वगळता नष्ट झाले आहे.
४. स्वातंत्र्यलढ्यातील स्फूर्तीदायी ठरलेल्या वन्दे मातरम् वरील बंदी देशवासियांनी झुगारून देणे, हा त्यातील सामर्थ्याचा परिणाम !
केवळ दोनच शब्द असलेल्या या मंत्रवत् अक्षरांची जादू आणि मोहिनी इतकी होती की, सर्व प्रकारची बंदी अन् बंधने झुगारून देऊन हे गीत बंगालमधून बाहेर पडून सर्व देशभर ज्याच्या त्याच्या मुखी झाले. सार्वजनिक सभा, संमेलने, आंदोलने आणि लढे, चित्रपटगीते अन् नाट्यपदे, एकल आणि वृंदगाने, शास्त्रीय संगीताच्या मैफिली, वाद्यवृंदावरचे गायन अशा अनेकानेक माध्यमांतून सातत्याने लोकांपर्यंत हे गीत वाजत-गाजत राहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांनी हे गीत मुद्रित करून ठेवले. स्वातंत्र्यलढ्यात वन्दे मातरम् ही स्फूर्तीदायी घोषणा ठरली, तर क्रांतीकारकांच्या तोंडी तो परवलीचा शब्द बनला. मादाम कामांनी बनवलेल्या काँग्रेसच्या पहिल्याच ध्वजावर वन्दे मातरम् ही अक्षरे लिहिली होती.
‘वन्दे मातरम’ हे राष्ट्रीय गीत एेकण्यासाठी येथे क्लिक करा !
– सुरेश चांदवणकर (दै. लोकसत्ता, ४.११.१९९९)