आपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते; मात्र त्यासाठी त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, हे त्यांचे कर्तव्य ठरते. आपल्या मुलावर सुसंस्कार करतांना आपण भारताचा भावी नागरिक घडवत आहोत, असा व्यापक दृष्टीकोन प्रत्येक पालकाने ठेवायला हवा ! त्यामुळे केवळ आपल्या मुलावर संस्कार करणे, एवढेच त्यांचे संकुचित ध्येय उरणार नाही, तर राष्ट्रउभारणीसाठी अप्रत्यक्षरीत्या केलेले ते प्रयत्नच ठरतील ! प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याचे आई-वडील हे सर्वांत पहिले व महत्त्वाचे शिक्षक असतात. एकमेकांवर प्रेम करण्यास आणि एकमेकांशी जमवून घेण्यास प्रथम आई-वडीलच मुलाला शिकवतात. लहापणापासून मुलाला प्रोत्साहन दिले, तर कोणतीही गोष्ट हाताळण्यास ते पटकन शिकते. मुलाला चमच्याने कसे जेवावे इथपासून मलमूत्रविसर्जनानंतर स्वच्छता कशी पाळावी, येथपर्यंत सारे पालक शिकवतात. लहान मुलांना गोष्टी वाचून दाखवल्याने त्यांना वाचनाची आवड निर्माण होते. मुले अनुकरणप्रिय असल्याने पालकांनी जोपासलेल्या छंदांचे ज्ञान त्यांना आपसूक होते.
आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान मुलांना शिकवायला हवे !
अडीअडचणीच्या वेळी कोणावर किती विश्वास ठेवायचा याचे ज्ञानही मुलांना त्यांचे पालक देऊ शकतात. जिवनातील वेगवेगळया प्रसंगांना कसे तोंड द्यावे, हे पालक त्यांना सांगू शकतात. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे, हे पालकांनी मुलांना सांगायला हवे. जीवनाचे ध्येय, जीवनाचे आदर्श हे सारे पालकांनी जबाबदारीने व विचारपूर्वक मुलांसमोर मांडायला हवे आणि मुलांनी त्याच्या दिशेने करावयाच्या वाटचालीच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शनही करायला हवे. या वेळी त्यांना काय योग्य व काय अयोग्य हे नेमकेपणाने सांगायला हवे; मात्र त्यांची मते त्यांच्यावर लादता कामा नयेत. त्यांचे निर्णय त्यांना घेण्याची मुभा जरूर द्यावी; मात्र पालकांनी सांगितलेल्या योग्य-अयोग्याच्या संकल्पना या एवढ्या स्पष्ट स्वरूपात त्याच्या मनावर बिंबायला हव्यात की मुलाने गैरवर्तन करताच कामा नये ! थोडक्यात पालकांनी आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांना शिकवायला हवे. मुलांच्या आयुष्याला दिशा देणारा तात्त्विक मुद्दा असू दे किंवा त्यांना शिकवायच्या छोट्या-मोठ्या सवयी असू दे, हे सारे संस्कार धार्मिकतेच्या पायावरीलच हवेत. हल्लीच्या बहुतांश पालकांचे स्वत:चे जीवनविषयक तत्त्वज्ञान हेच पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारलेले व चंगळवादी बनलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मुलांवरही त्याच विचारांचे व कृतींचे संस्कार केले जातात.
पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखालील पालक मुलांवर काय संस्कार करणार ?
अधिक गुण, गुणांची स्पर्धा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची स्पर्धा, पैसा, त्यासाठी करियर हा पालकांचा मुलांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन झाला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण व स्वसंस्कृतीचे विस्मरण यामुळे सध्याची लाडकी मुले `ऐकत नाहीत’ असेच चित्र बहुतांश बघायला मिळते. यासाठी पालक त्यांना जास्तीतजास्त विविध छंद आणि शिकवणीवर्गांना घालून व्यस्त ठेवण्याच्या मागे असतात. त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, अशी बहुतांश सुशिक्षित पालकांची मनापासून इच्छा असते. मात्र अशा स्थितीत नेमके काय करावे, हे त्यांनाही कळत नसते.
मुलांवर सुसंस्कार होण्यासाठी साधनेचे पाठबळ द्या !
हे सुसंस्कार होणार कसे ? मुले सदवर्तनी होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे पालकांनी स्वत: सद्वर्तनी असायला हवे आणि दुसरे म्हणजे त्यांना शिस्त लावण्याच्या जोडीला त्यांना भक्ती करण्यास शिकवायला हवी. साधनेचे किंवा उपासनेचे पाठबळ असेल, तर मुलांमध्ये सद्गुण चटकन अंगी बाणतात. हट्टी किंवा न ऐकणार्या मुलांना बदलण्याची शक्ती ही भगवंताच्या नामात आहे आणि याचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. प्रथम पालकांनी भक्तीचे बीज स्वत:त पेरायला हवे, मगच ते बीज आपल्या मुलात निर्माण होणार. `वाल्याचा वाल्मिकी झाला’ अशा गोष्टी आपण सांगतो. म्हणजेच भगवंताच्या नामातच मुलांमध्ये अमूलाग्र बदल करण्याची क्षमता आहे, याची जाणीव सर्व पालकांना होवो व सर्व पालकांच्या माध्यमातून सुसंस्कारित सद्गुणांनी पिढी राष्ट्राला मिळून ईश्वरी राज्य लवकर येवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.