संस्कृत ही ईश्वरनिर्मित भाषा !
आपल्या वैदिक परंपरेने विश्वनिर्मितीपासूनचा साद्यंत इतिहास जतन करून ठेवला आहे. प्रथम सर्वत्र शून्य होते. मग ‘ॐ’ असा ध्वनी अवकाशात निनादला. शेषषायी श्रीविष्णु प्रगट झाला. त्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगटला. त्यानंतर प्रजापति, मातृका, धन्वंतरी, गंधर्व, विश्वकर्मा आदी निर्माण झाले. त्याच वेळी विश्वाचे ज्ञानभांडार ज्यात सामावले आहे, असे वेद ईश्वराने उपलब्ध करून दिले. वेद संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत ही ‘देववाणी’ आहे. वेद जसे अपौरुषेय म्हणजे ईश्वरप्रणीत आहेत, तशीच संस्कृत भाषाही ईश्वरनिर्मित आहे. तिची रचना आणि लिपी ईश्वराने निर्माण केली आहे; म्हणून त्या लिपिलाही ‘देवनागरी’ म्हणतात. संस्कृत भाषेची सर्व नावेही ती देवभाषा असल्याचे स्पष्ट करतात, उदा. ‘गीर्वाणभारती’ हे नाव पहा. त्यातील ‘गीर्वाण’ या शब्दाचा अर्थ ‘देव’ असा आहे.
ईश्वराच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. मानवाच्या निर्मितीनंतर मानवाला आवश्यक ते सर्वकाही त्या ईश्वरानेच दिले. एवढेच नव्हे, तर मानवाला काळाप्रमाणे पुढे ज्याची आवश्यकता भासेल, तेही द्यायची त्याने व्यवस्था केली आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच ईश्वराने मनुष्यप्राण्याला मोक्षप्राप्तीसाठी उपयोगी पडणारी आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेली अशी एक भाषा तयार केली. तिचे नाव ‘संस्कृत’ !
आद्यमानव मनु आणि शतरूपा यांना ब्रह्मदेवाने संस्कृत शिकवले. ब्रह्मदेवाने आपल्या अत्री, वसिष्ठ, गौतमादी मानसपुत्र ऋषींना वेद शिकविले, संस्कृत शिकविले.
दत्तगुरूंनी संस्कृत भाषेची पुनर्निर्मिती केली
त्रेतायुगामध्ये जिवाची शब्दातीत ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता कमी झाली. त्यामुळे शब्दांच्या माध्यमातून जिवाला ज्ञान प्राप्त होऊन मोक्षप्राप्ती सुलभतेने व्हावी, यासाठी दत्तगुरूंनी संस्कृत भाषेची पुनर्निर्मिती केली.
द्वापारयुगापर्यंत संस्कृत हीच विश्वभाषा !
सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग या तीन युगांमध्ये संस्कृत हीच विश्वाची भाषा होती. त्यामुळे तिला ‘विश्ववाणी’ही म्हणतात. अगदी कौरव-पांडवांच्या काळापर्यंत संस्कृत हीच विश्वातील एकमेव भाषा होती !