गोळवलकर घराणे
गोळवलकर घराणे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली या गावचे होते. या गावातील पाध्ये घराण्याची एक शाखा नागपूरला गेली आणि त्यांचे आडनाव गोळवलकर झाले. गुरुजींच्या वडिलांचे नाव सदाशिवराव, तर आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वडील ज्ञानमार्गी, तर आई भक्तीमार्गी होती. या दांपत्याला नऊ अपत्ये झाली; परंतु माधव (गुरुजी) फक्त वाचला. त्यांचा क्रमांक चौथा होता.
जन्म व प्राथमिक शिक्षण
माघ वद्य एकादशी शके १८२७ या तिथीला (१९ फेब्रुवारी १९०६ ला) नागपूरला माधवचा जन्म झाला. माधवचे मराठी इतकेच हिंदी आणि इंग्रजी भाषांवरही प्रभुत्व होते. त्याने शंकराचार्य, रामानुजाचार्य यांचे संस्कृतमधील ग्रंथ वाचले होते. त्याचे पाठांतर उदंड होते. माधवच्या वर्गात शिक्षकांनी एकदा तुलसी रामायणाची महती सांगितली. त्याने लगेच ठरवले की, संपूर्ण तुलसी रामायण वाचून काढायचे. माधव सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत रामायण वाचत बसायचा. जेवणाच्या वेळीही त्याला बळेबळे उठवावे लागे. तो रात्री अगदी थोडा वेळ झोपायचा. ५ दिवसांत त्याने तो ग्रंथ वाचून संपवला. नुसताच वाचला नाही, तर त्यातील अनेक दोहे त्याने पाठ केले. मग तो आईला रामायणातील गोष्टी सांगू लागला. आईने ‘मग हनुमंत काय म्हणाला ?’ असा एखादा प्रश्न विचारल्यावर माधव तो कथाप्रसंग सांगण्यात एक तास तरी रंगून जाई.
महाविद्यालयीन शिक्षण
माधवराव इंटरसायन्सची परीक्षा उत्तीर्ण झाले. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ते लखनौला गेले; पण तेथे त्यांना प्रवेश मिळाला नाही. शेवटी त्यांनी काशी येथील हिंदु विश्वविद्यालयात बी.एस्सी.च्या वर्गात प्रवेश घेतला.
ते गंगेच्या किनार्यावर जाऊन बसायचे व गंगेच्या पवित्र धारेकडे पहात ध्यानमग्न व्हायचे. माधवरावांना या सगळ्या गोष्टींची चटकच लागली. ते मदनमोहन मालवियांकडे जात. अनेकदा ते श्रीरामकृष्ण आश्रमात जायचे. भारतीय तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राजनीतीशास्त्र आदी विषयांवरील प्रमाणभूत ग्रंथांचा त्यांनी या काळात अभ्यास केला. १९२६ साली ते बी.एस्सी. झाले. १९२८ मध्ये प्राणीशास्त्र विषय घेऊन ते प्रथम श्रेणीत एम्.एस्सी. झाले.
संघाशी संबंध
याच काळात नागपूरच्या रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी भास्करेश्वरानंद यांच्याशी माधवरावांचा संपर्क वाढला. या वेळी त्यांनी विवेकानंदांच्या साहित्याचा अभ्यास केला. कौटुंबिक परिस्थितीमुळे माधवरावांनी काशीच्या विश्वविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. शिकवण्याच्या हातोटीमुळे ते विद्याथ्र्यांत प्रिय झाले. विद्यार्थी त्यांना मोठ्या आदराने ‘गुरुजी’ म्हणू लागले !
भय्याजी दाणी व काशी हिंदु विश्वविद्यालयातील अन्य स्वयंसेवक यांच्यामुळे माधवरावांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार काशी येथे आले असता त्यांची भेट झाली. डॉक्टरांच्या वागण्या-बोलण्याने ते फार प्रभावित झाले. ते मधूनमधून संघशाखेत जाऊ लागले.
डॉ. हेडगेवारांनी त्यांना नागपूरचा संघाचा विजयादशमी उत्सव पहायला बोलावले. ते माधवरावांना आपल्याबरोबर भंडारा येथेही घेऊन गेले. प्रवासात त्यांनी डॉक्टरांना संघासंबंधी अनेक प्रश्न विचारले. डॉक्टरांची उत्तरे ऐकून त्यांचे बरेच समाधान झाले. नागपूरहून परतल्यावर काशी येथील संघशाखेकडे माधवराव विशेष लक्ष देऊ लागले.
संघाचे स्वयंसेवक माधवरावांकडे येऊ लागले. माधवरावही स्वयंसेवकांकडे जाऊ लागले. तात्त्विक चर्चेच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष प्रेम व बंधुत्व यांचा व्यवहार सुरू झाला. ते आपलेपणाने स्वयंसेवकांच्या अडचणी दूर करू लागले. अनेकदा ते स्वयंसेवकांना घेऊन पंडित मदनमोहन मालवीयजी यांच्याकडे जात असत. संघाचे कार्य पाहून मालवीयजींनी विद्यापिठाच्या परिसरात संघशाखेसाठी जागा दिली व लहानशी वास्तूही बांधून दिली.
आता डॉ. हेडगेवारसुद्धा त्यांना ‘गुरुजी’ म्हणू लागले. डॉक्टरांच्या तोंडून पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ऐकले, ‘‘गुरुजी, तुम्हाला आज शाखेत स्वयंसेवकांसमोर बोलायचे आहे.’’ तेव्हा काहीशा संकोचाने ते म्हणाले, ‘‘हे काय डॉक्टर, आपण मला गुरुजी म्हणता ?’’ डॉ. हेडगेवार त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही थोडेच काय विशिष्ट वर्गातील विशिष्ट मुलांना शिकवणार आहात ? तुम्ही सर्वांचेच गुरुजी आहात!’’
संघकार्यात प्रत्यक्ष लक्ष घालणे
मुंबईतील संघाच्या शाखेची स्थिती वाईट झाली होती. ‘काम कमी आणि गोंधळ फार म्हणतात’, तसे तेथे झाले होते. हे ऐकल्यावर गुरुजी डॉ. हेडगेवार यांना म्हणाले, ‘‘सध्या महाविद्यालयाला सुट्टी आहे. आपण म्हणाल, तर मी मुंबईला जाईन व तेथील शाखेला नीट रूप देण्याचा प्रयत्न करीन.’
गुरुजींच्या तोंडचे शब्द ऐकून डॉक्टरांना फार आनंद झाला. त्यांनी लगेच गुरुजींना मुंबईला पाठवले. खूप परिश्रम करून गुरुजींनी मुंबईच्या कामाला नवी गती दिली. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील शंकाकुशंका दूर केल्या. यशस्वी होऊन गुरुजी नागपूरला परत आले.
१९३४ च्या उन्हाळ्यामध्ये अकोला येथे संघशिक्षा वर्ग झाला. डॉक्टरांनी गुरुजींना या वर्गाचे सर्वाधिकारी नेमले. त्यांनी वर्गातील लहान-मोठ्या स्वयंसेवकांची नीट काळजी घेतली. आजारी स्वयंसेवकांजवळ बसून ते स्वतः त्यांची शुश्रूषा करत असत.
विवाह न करण्याचा ठाम निश्चय
१९३५ साली ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. वडिलांनी गुरुजींना यापूर्वी विवाहाविषयी विचारले होते; पण गुरुजींनी त्यांना स्पष्ट शब्दांत नकार देतांना म्हटले होते, ‘‘विवाह करण्याची माझी इच्छा नाही. प्रपंचात सुख लाभेल, असे मला वाटत नाही.’’ मातेचा प्रेमळ आग्रह मोडणे कठीण असते; पण गुरुजींनी आईलाही सांगितले, ‘‘माझ्यासारख्या अनेकांचे वंश नष्ट होऊन समाजाचे थोडेजरी कल्याण होणार असेल, तर आजच्या परिस्थितीत ते आवश्यक आहे. आपला वंश नष्ट होईल, याची मला थोडीही खंत वाटत नाही.’’
गुरुमंत्र
अचानक ऑक्टोबर १९३६ च्या तिसर्या आठवड्यात, दिवाळीला सात-आठ दिवस उरले असतांना गुरुजी कोणालाही न सांगता कोलकात्यापासून १२० मैल दूर असलेल्या सारगाछी येथील स्वामी अखंडानंद यांच्या आश्रमात गेले. स्वामी अखंडानंदांनी श्रीगुरुजींना दीक्षा दिली, गुरुमंत्र दिला व समाजात जाऊन कार्य करण्यासाठी आशीर्वाद दिला. गुरुजी नागपूरला परत आले.
सरसंघचालकपदी नियुक्ती
१९३८ साली नागपूरच्या संघशिक्षा वर्गात गुरुजींनी सर्वाधिकारी म्हणून उत्तम सेवा केली. शारीरिक कार्यक्रम, भोजन व्यवस्था, रुग्णालय, स्वच्छता आदी सर्व गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असे. रात्री भोजन मंडपात जाऊन तेथील अग्नी नीट विझवला आहे कि नाही, हेसुद्धा ते पहात असत.
१९३९ मध्ये त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सरकार्यवाह म्हणून घोषित करण्यात आले. या वेळी डॉक्टरांनी संघातील काही प्रमुख मंडळींची १० दिवसांची एक बैठक घेतली. या बैठकीत संघाची घटना, आज्ञा, प्रार्थना, प्रतिज्ञा इत्यादींसंबंधी अनेक मूलभूत निर्णय घेण्यात आले. आज प्रचलित असलेल्या संघाच्या संस्कृत प्रार्थनेचा मूळ मराठी आलेख याच बैठकीत गुरुजींनी लिहिला. त्यानंतर डॉक्टरांनी गुरुजींना संघाची शाखा सुरू करण्यासाठी कोलकाता येथे पाठवले. गुरुजी आता डॉक्टरांबरोबर प्रवास करू लागले. बहुदा डॉक्टर त्यांनाच बोलायला सांगत व ते काय बोलतात, कसे बोलतात हे लक्षपूर्वक ऐकत. पुढे डॉक्टरांच्या योजनेनुसार सरकार्यवाह या नात्याने गुरुजींनी देशातील अनेक प्रमुख नगरांना भेटी दिल्या. १९४० साली पुन्हा त्यांना नागपूरच्या संघशिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी नेमण्यात आले. या वर्गाच्या समारोपाला डॉ. हेडगेवार यांनी केलेले भाषण शेवटचे ठरले. आपला उत्तराधिकारी म्हणून डॉक्टरांनी गुरुजींचे नाव याच काळात सर्वांना सांगितले. २१ जून १९४० रोजी डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर गुरुजी सरसंघचालक झाले.
निर्भयता
सरसंघचालक झाल्यापासून गुरुजींचा प्रवास सुरू झाला, तो सतत ३३ वर्षे चालू राहिला. पायी, बैलगाडीने, टांग्याने, सायकलीने, मोटारीने, आगगाडीने, विमानाने अशा सर्व प्रकारच्या वाहनांनी त्यांनी लाखो मैल प्रवास केला. प्रत्येक प्रांताला ते वर्षातून दोनदा तरी भेट देत असत.
दुसरे महायुद्ध सुरू झाले, त्या वेळी बंगालमध्ये गुरुजींचा प्रवास ठरला होता. जपानी आक्रमणामुळे बंगालमधील लोक भयभीत झाले होते. कार्यकत्र्यांनी गुरुजींना दौरा रद्द करण्यासंबंधी कळवले. गुरुजींनी ताबडतोब संबंधितांना तारा केल्या व दौरा ठरल्याप्रमाणेच होईल, असे कळवले. हा सर्व दौरा व्यवस्थित पार पडला. गुरुजी कार्यकत्र्यांसमोर म्हणाले, ‘‘जेव्हा इतर लोक घाबरले असतील, तेव्हा आपण दृढतेने पाय रोवून उभे राहिले पाहिजे. संघाला सर्वत्र निर्भयता निर्माण करायची आहे. आपणच जर भ्यायलो, तर लोकांनी कोणाकडे पहावे बरे ?’’
संघावरील पहिली बंदी व गुरुजींना अटक
जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. गांधीजींच्या हत्येशी संघ किंवा गुरुजी यांचा काहीही संबंध नव्हता; पण तत्कालीन पंतप्रधान व काँग्रेसी नेते यांनी संघावर वाटेल, तसे आरोप करायला सुरुवात केली. इर्षा, मत्सर व द्वेष यांचे थैमान सुरू झाले. गांधींचे नाव घेत राज्यकर्ते खोट्या गोष्टी बोलू लागले. आकाशवाणी, वर्तमानपत्रे यांच्या माध्यमातून विषवमन होऊ लागले.
गावोगावी स्वयंसेवकांना मारहाण झाली. काहींना जिवंत जाळण्यात आले, तर काहींची घरे पेटवण्यात आली. पोलिसांनी गुरुजींना पकडले. ४ फेब्रुवारी १९४८ रोजी सरकारने संघकार्य बेकायदा असल्याचे घोषित केले.
संपूर्ण देशात नाना प्रकारचे आरोप ठेवून सहस्रो स्वयंसेवकांना पकडण्यात आले. गुरुजींवर गांधीजींच्या हत्येचा कट करणे, मारामारी करणे, सरकार उलथून टाकण्याचा यत्न करणे, असे आरोप ठेवण्यात आले. थोड्याच दिवसांत आपला मूर्खपणा कळून आल्यावर सर्व आरोप काढून गुरुजींना केवळ स्थानबद्ध ठेवण्यात आले. कारागृहात त्यांनी संघकार्याच्या चिंतनाबरोबर आसने, ध्यानधारणा, जपजाप्य इत्यादी गोष्टी अधिक प्रमाणात सुरू केल्या. ६ ऑगस्ट १९४८ रोजी सरकारने त्यांना मुक्त केले व परत १२ नोव्हेंबर १९४८ रोजी अटक केली.
संघाने देशव्यापी सत्याग्रहाचा आदेश दिला. लहान-मोठ्या नगरांत संघाच्या अधिकार्यांनी सत्याग्रहाची घोषणा केली. शेवटी लिखित घटना घेऊन संघावरील बंदी उठवण्यात आली.
अन्य सेवाकार्ये
गुरुजींच्या आदेशानुसार डॉ. शामाप्रसाद मुखर्जी राजकीय क्षेत्रात काम करू लागले. ‘भारतीय जनसंघ’ या नावाने राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदु परिषद, वनवासी कल्याण, महारोगी सेवा, राष्ट्रीय शिशू शिक्षण आदी अनेक संस्था गुरुजींच्या प्रेरणेने सेवा करू लागल्या. डॉ. हेडगेवार यांच्या समाधीस्थानी स्मृतीमंदिराची उभारणी, कन्याकुमारीचे विवेकानंद शिलास्मारक, तसेच शेकडो शिक्षण संस्था गुरुजींच्या प्रेरणेने उभ्या राहिल्या.
महानिर्वाण
१९६९ पासून गुरुजींच्या प्रकृतीची अस्वस्थता वाढू लागली, तरी त्यांचा प्रवास अव्याहत चालूच होता. ते विनोदाने ‘आगगाडीचा डबा हेच माझे घर आहे’ असे म्हणत. १८ मे १९७० ला त्यांच्या अस्वस्थतेचे कारण निश्चित झाले, कर्करोग!
ज्येष्ठ शुद्ध पंचमी, ५ जून १९७३ रोजी पार्थिव देहाचा त्याग करून गुरुजी सच्चिदानंद स्वरूपात विलीन झाले. प.गुरुजींच्या चरणी आमचे लाख लाख प्रणाम !’
– श्री. मुळ्ये, रत्नागिरी.