खुदीराम बोस


खुदीराम बोस भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी हुतात्मा झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.

बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने १९०३ साली निश्चीत केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने मिदनापूर येथे थोडेफार शिक्षण झाल्यावर त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. थोडयाच दिवसांत मुझफफरपूरचे मॅजिस्ट्रेट जे क्रांतिकारकांना अमानुष शिक्षा देत, त्यांना मारण्याची जबाबदारी क्रांतिकारकांचे नेते बरींद्रकुमार व उपेंद्रनाथ यांनी खुदीरामवर सोपवली व मदतनीस म्हणून प्रफुल्लचंद्र चक्रवर्ती याला मदतीला दिले. ते दोघेही मुझफरपूरमध्ये आले व मॅजिस्ट्रेट किंग्जफ़ोर्ड याच्यावर लक्ष ठेवून संधीची वाट पाहू लागले. न्यायाधीश किंग्ज फोर्डला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे त्यांनी पक्के केले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील ''वंदे मातरम'' या गीताने त्यांनी लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.

खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याच्या सहकार्‍याने दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर बाँब फेकून त्याला मारण्याचे निश्चीत झाले. त्याप्रमाणे एक बाँब फेकण्यात आला. परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर फेकण्यात आल्याने त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. खुदीराम व त्याचा साथीदार यांनी तत्काळ पळ काढला. खुदीराम रातोरात चाळीस किलोमिटर पळाला व बेनी रेल्वे स्टेशवर आला. भूक लागल्यामुळे तो एका दुकानात चणेफुटाणे घेत असताना तेथील स्टेशनमास्तर र्पोटरला म्हणत होता, 'अरे ही बातमी वाचली का?' काल मुझफपुरला दोन मडमांचा खुन करुन दोघे जण फरारी झाले आहे. त्यांना पकडण्यासाठी वॉरंट सुटले आहे. तेव्हा आता ही गाडी येईल त्यात कोणी सापडते का पाहा. खुदीरामने हे भाषण ऐकताच, तो एकदम म्हणाला, ''काय, किंग्जफ़ोर्ड मेला नाही.'' जवळच्या लोकांना त्याच्या या उदगाराचे आश्चर्य वाटले व त्यांना शंका आली. त्याबरोबर खुदीरामने तेथून पळ काढला. घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडला गेला, तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामजवळ दोन पिस्तुले व ३० काडतुसे सापडली. त्याच्यावर ३०२ कलमाखाली खटला भरुन त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. ११ ऑगस्ट १९०८ रोजी हा तरुण वीर हातामध्ये गीता घेऊन व भारतमाता की जय म्हणत हसत हसत आनंदाने फाशी गेला. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतीकारक ठरला.



खुदीराम बोस यांची भारतीय डाक मुद्रांकावरील प्रतिमा

Leave a Comment