तिथी व इतिहास
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.
वैशिष्ट्य
`गोकुळाष्टमी’ या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.
उत्सव साजरा करण्याची पद्धत
गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात
दहीकाला
विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. तो श्रीकृष्णतत्त्वाच्या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर आहेत. जन्माष्टमीला काला प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने श्रीकृष्णतत्त्वाचा लाभ होतो. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या मातृभक्तीचे प्रतीक
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक
ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
गोकुळाष्टमीच्या प्रथेची सुरुवात कशी झाली ?
श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात व तेव्हा प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. काला म्हणजे विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी एकत्र कालविणे. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्यांचा काला केला व सर्वांसह तो खाल्ला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
संदर्भ : सनातन – निर्मित ग्रंथ, ‘ सण,धार्मिक उत्सव व व्रते ‘