संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडीलबंधू आणि गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे सदगुरू रहात होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे राहू लागले.
पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. त्यांनी आपल्या मुलांना त्या काळच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले.
त्यावेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले. त्या डोंगरावर दाट अरण्य होते. डोंगरात हिंडता-हिंडता एक वाघ धावत आला. त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. विठ्ठलपंत बायकोमुलांसह पळाले. ते अरण्यातून बाहेर पडले, तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला; पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनात! पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत. असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. सर्वांना फार आनंद झाला. ते अधिक तेजस्वी दिसत होते. विठ्ठलपंतांनी विचारले, ''अरे इतके दिवस तू कुठे होतास ?'' निवृत्तीनाथ म्हणाले, ''बाबा, वाघाला भिऊन पळतांना मी एका गुहेत शिरलो. त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. त्यांचे नाव गहिनीनाथ. त्यांनी मला योग शिकवला आणि 'आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत, त्यांना तू सुखी कर', असे सांगितले.''
नंतर मुलांची मुंजीची वेळ आली. मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठलपंत आळंदीला आले; पण आळंदीच्या निष्ठूर लोकांनी त्यांना सांगितले, ''तुम्ही संन्यासातून परत गृहस्थाश्रम स्वीकारला आहे. तुम्हाला देहान्त प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित्त नाही. ते तुम्ही घ्याल, तरच मुलांच्या मुंजी होतील.'' हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत घरी गेले. मुले गाढ झोपेत आहेत, हे पाहून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घरचा निरोप घेतला. ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये जलसमाधी घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपले आई-वडील घर सोडून गेल्याचे कळले. त्यांच्या डोक्यावरचे छत्रच नाहीसे झाले. सर्व भार निवृत्तीनाथांवर पडला होता. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला.
पुढे गुरु निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेत असलेली श्रीमद्भगवद्गीता सर्वांना समजावी यासाठी 'ज्ञानेश्वरी' हा अप्रतिम ग्रंथ मराठीत लिहिला. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी 'अमृतानुभव' हा ग्रंथ लिहिला. यात दहा प्रकरणे आणि सुमारे सात-आठशे ओव्या आहेत; पण त्यात गहन असा आध्यात्मिक अनुभव भरलेला आहे. हा जगाच्या तत्त्वज्ञानातील एक अपूर्व ग्रंथ आहे.
मुलांनो, लहान वयात निवृत्तीनाथांचे आई-वडील घरदार सोडून गेले, तरी त्यांनी आपल्या भावंडांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. हे केवळ साधनेमुळेच शक्य झाले. त्यामुळे साधना करणे किती आवश्यक आहे, हे कळले असेलच.