बालमित्रांनो, महाराष्ट्राच्या संत मालिकेत मध्यप्रदेश प्रांतातून संत सेना महाराज भक्तीची पालखी घेऊन आले. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड संस्थानात झाला. ते पंढरपूरचे एक महान वारकरी संत होते. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग पाहू.
बालपणापासूनच संत सेना यांना परमेश्वरभक्तीची आवड होती. त्यांचे वडील संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांचे गुरुबंधू होते. त्यांच्या घरी नेहमी साधूसंत येत असत. त्यांची सेवा सेना आणि त्याचे वडील मनोभावे करत असत.
सेना लोकांचे दाढी-डोई करण्यात प्रवीण होते. लोक त्यांच्याकडे क्षौर करवून घेण्यासाठी येत. तसेच त्यांच्या भजन-कीर्तनालाही दाटी करत. सेना यांची कीर्ती सम्राटाच्या कानी गेली. त्याने सेना यांना बोलवून घेतले आणि आपल्याकडे चाकरीला ठेवले.
एकदा सेना पांडुरंगाची पूजा करत बसले होते. त्याच वेळी सम्राटाकडून तीन-चार बोलावणी आली. पत्नीने प्रत्येक वेळी ‘ते घरात नाहीत’, असे सांगितले. त्यांच्या शेजाऱ्याने ते पाहून लगेच सम्राटाला कळवले. ‘सेना न्हावी घरात देवपूजा करत बसला आहे. त्याच्या बायकोने तो घरात नसल्याचे खोटे सांगितले.’ ते ऐकून सम्राटाला फार राग आला. सेनाची मोट बांधून त्याला नदीच्या वाहात्या प्रवाहात टाकून देण्याची आज्ञा त्याने सेवकांना दिली. आपला प्रिय भक्त संकटात सापडल्याचे पाहून पांडुरंग सेना यांचे रूप घेऊन सम्राटासमोर गेला. त्याला पहाताच सम्राटाचा राग शांत झाला. तो क्षौर करण्यास बसला. क्षौर करत असतांना सम्राट मान खाली करी, त्या वेळी रत्नखचित वाटीतील तेलात सम्राटाला पांडुरंगाचे प्रतिबिंब दिसे. वर पाहिले असता समोर सेना न्हावी दिसू लागे. वाटीतील पांडुरंगाचे ते रूप पाहून सम्राट अगदी मोहित झाला. त्याचे देहभान हरपले. क्षौर झाल्यावर सम्राटाने त्याला ओंजळभर होन दिले. पांडुरंगाने ते पिशवीत ठेवून ती पिशवी सेना यांच्या घरी नेऊन ठेवली आणि तो गुप्त झाला.
सम्राटाला ते ईश्वरी रूप पहाण्याची ओढ लागली. दुपारी त्याने पुन्हा सेना यांना बोलावून घेतले. त्यांना पहाताच सम्राटाने सकाळची वाटी आणवली आणि म्हणाला, ”सकाळी मला या वाटीत जे चतुर्भुज रूप दिसत होते, ते मला पुन्हा दाखव.” याविषयी काही ठाऊक नसलेला सेना सम्राटाचे उदगार ऐकून आश्चर्यचकित झाला. हा चमत्कार पांडुरंगाचाच असावा, असे समजून सेना पांडुरंगाचा धावा करू लागले. तेव्हा सम्राटाला पुन्हा पांडुरंगाचे ते मोहक रूप दिसले. नंतर सेना यांना आपल्या पिशवीत होन दिसले. त्यामुळे सेना यांना या चमत्काराविषयी निश्चिती वाटून त्यांनी लगेच पांडुरंगाला कृतज्ञता व्यक्त केली. या चमत्कारामुळे सम्राट विरक्त होऊन पांडुरंगाचे भजन करू लागला. या अदभुत प्रसंगामुळे संत सेना यांचे जीवनच पालटून गेले.
मुलांनो, ईश्वर भक्तासाठी कसा धाऊन येतो, ते पाहिलेत ना ! आपणही ईश्वराची भक्ती केली, तर तो आपल्या साहाय्याला धाऊन येईल. मात्र भक्ती मनापासून केली पाहिजे. भक्तीमुळे असाध्य ते साध्य होते.