सर्व जग जेव्हा शांत झोपलेले असे, तेव्हा रामकृष्ण परमहंस निबीड अरण्यात आमला वृक्षाखाली ध्यानमग्न होऊन कालीमातेची उपासना करत असत. रामकृष्णांचा पुतण्या हरीदाला प्रश्न पडत असे, 'प्रतिदिन रात्री रामकृष्ण जातात तरी कोठे ? काय करतात ?' एका रात्री त्यांच्या मागावर हरिदा राहिला. रामकृष्ण घनदाट अरण्यात शिरले. त्यांच्या हातात ना दिवा होता, ना कंदील. रामकृष्णांनी आवळयाच्या झाडाखाली पद्मासन घातले आणि डोळे मिटले. डोळे मिटण्याअगोदर त्यांनी गळयात घातलेले जानवेही भगव्या वस्त्रांसमवेत उतरवून ठेवले. हरिदाला आश्चर्य वाटले. सूर्योदयापर्यंत रामकृष्ण अविचल बसून होते. काही वेळाने त्यांनी ते यज्ञोपवित चढवले. सूर्योपासना केली. हरिदा हे सारे पहात होता. रात्रीपासून अस्वस्थ करणारा प्रश्न त्याने केला, ''आपण उपासनेच्या वेळी जानव्यासह सर्व गोष्टी का उतरवून ठेवता ? हे वेड्यासारखे वाटत नाही का ?'' त्यावर रामकृष्ण म्हणाले, ''हरिदा, परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे असतात. द्वेष, मत्सर, भीती, अहंकार, लोभ, मोह, जातीचा अभिमान, अशा कितीतरी गोष्टी जेव्हा मी जगन्मातेचे ध्यान करतो, तेव्हा या सगळया गोष्टींचा त्याग करायचा प्रयत्न करतो. नाहीतर या गोष्टी मनात थैमान घालतात. जानवे हे जातीचा अभिमान, ज्ञानाचा अहंकार, तोसुद्धा मला बाजूला करायलाच हवा ना ! अहंकाराचे अडथळे पार करत मला तेथे पोहोचायचे आहे.
मुलांनो, साधनेमध्ये अहंकाराचा अडथळा हा फार मोठा आहे. अहंकारामुळे आपण ईश्वरापासून दूर रहातो. त्यासाठी 'मी', 'माझे' याचा त्याग करायला पाहिजे. असे केल्यानेच आपण सर्वव्यापी बनतो आणि ईश्वराला तेच अपेक्षित आहे.