वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभरमावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. खिस्ताब्द १६७४ मध्ये त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.
रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक । |
सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. तो समुद्रसपाटीपासून ४६९४ फूट उंचावर वसला आहे. येथून वैराटागड, केंजळगड, पांडवगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर, रायगड, लिंगाणा, तिकोणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, प्रतापगड, चंद्रगड इ. गड दिसतात. रायरेश्वर पठाराची लांबी ११.०४ कि.मी. असून, रुंदी १.०२ कि.मी. आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिवमंदिर आणि जननी देवीचे मंदिर आहे. छ. शिवाजी महाराजांनी शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे पूजेसाठी नेमला होता. सध्या येथे जंगम लोकांची ४० कुटुंबे रहातात.
सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.