भारत ही संतांची भूमी आहे. असे असले, तरी राष्ट्रहितासाठी कार्य करणार्या संतांची संख्या खूप दुर्मिळ आहे. त्यांतीलच एक म्हणजे रामदास स्वामी ! लहानपणी त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग आणि त्यांचा साधना प्रवास थोडक्यात येथे देत आहोत.
१. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने नारायण अंतर्मुख होणे
समर्थ रामदास स्वामींचा जन्म जांब (जिल्हा – जालना) या गावी ख्रिस्ताब्द १६०८, शके १५३०, चैत्र शुक्ल पक्ष नवमीला मध्यान्ही दुपारी १२ वाजता झाला. योगायोगाने प्रभु श्रीरामचंद्र आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्माची वेळ, तिथी आणि मास एकच आहेत. लहानपणी त्यांना नारायण या नावाने ओळखत. त्यांच्या आई-वडिलांचे नाव सूर्याजीपंत आणि राणूबाई ठोसर असे होते. त्याचे वडीलबंधू गंगाधर स्वामी यांना सर्वजण श्रेष्ठ म्हणत असत. आठ वर्षांचा असतांनाच वडिलांचा मृत्यू झाल्याने नारायण अंतर्मुख झाला.
२. प्रभु रामरायांनी समर्थ रामदास स्वामींना मंत्रोपदेश देऊन धर्मस्थापनेचे कार्य करण्याची आज्ञा देणे आणि छत्रपती शिवाजी जन्मास येणार असल्याचे सांगून त्यांचे साहाय्य घेण्यास सांगणे
वडिलांच्या मृत्यूनंतर पुढील वर्षीच त्यांना प्रभु रामरायाची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांनी समर्थांना मंत्रोपदेश देऊन १३ अक्षरी श्रीराम जय राम जय जय राम । या मंत्राचा जप करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे पूजेसाठी बाण, जपासाठी माळ, हुर्मजी रंगाचे वस्त्र, रामनामांकित पत्र दिले. तसेच त्यांना आज्ञा दिली, कलीच्या प्रथम चरणात यवनांच्या वर्चस्वास आरंभ होईल. तेव्हा तुम्ही धर्मस्थापना करावी आणि तेच कार्य शेवटपर्यंत करावे. त्यासाठी आपण कृष्णाकाठी निवास करावा. शिसोदे वंशात त्या वेळी सांब अंशेकरून राजा छत्रपती शिवाजी जन्मास येईल. त्यांना मंत्रोपदेश देऊन धर्मस्थापनेच्या कार्यात त्यांचे साहाय्य करून घ्यावे.
३. कुशाग्र बुद्धीमुळे ३ वर्षांचा शालेय अभ्यासक्रम ६ मासांत पूर्ण करणे
नारायण हा शिवाच्या मारुतीचा अवतार असल्याने त्याची बुद्धी कुशाग्र तर होतीच; पण हूडपणाही अंगी भरला होता. परिणामतः त्याने त्या वेळचा ३ वर्षांचा शालेय अभ्यासक्रम ६ मासांतच (महिन्यांतच) पूर्ण केला.
४. लग्नाच्या बेडीत अडकवण्यासाठी आईने नारायणकडून बोहल्यावर उभे रहाण्याचे आश्वासन मिळवणे आणि शुभमंगल सावधान हा शब्द ऐकताच सावध होऊन लग्नमंडपातून पलायन करणे
त्यानंतर आईने नारायणाला लग्नाच्या बेडीत अडकवण्याचा विचार केला. तसे तिने श्रेष्ठांना बोलून दाखवल्यावर ते म्हणाले, आई, नारायण हा सामान्य मुलगा नाही. लग्नाचा विषय काढला की, तो किती रागावतो, हे तुला ठाऊक आहे. तेव्हा हा विचार सोड ! आईला हे म्हणणे पटले नाही. तिने नारायणशी गोड बोलून बोहल्यावर उभे रहाण्याचे आश्वासन मिळवले आणि लग्न ठरले. मुहूर्तावर शुभमंगल सावधान ! असे मंगलाष्टक चालू होते न होते तोच नारायण साप असे ओरडला. लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला आणि त्याच गोंधळाचा लाभ घेऊन त्याने तिथून धूम ठोकली अन् तो नाशिकजवळ टाकळी येथे विसावला. सावधान हा शब्द कानी पडताच नारायण खर्या अर्थाने सावध झाला होता, तसेच त्याने आईला दिलेला शब्दही पाळला होता.
५. प्रभु रामरायांचे दर्शन आणि रामदास स्वामी बनणे
नंतर त्याने टाकळी येथे नंदिनी अन् गोदावरी नदीच्या संगमात १२ वर्षे गायत्री पुरश्चरण केले. त्याला प्रत्यक्ष प्रभु रामरायांनी दर्शन दिले आणि त्यांच्याच सांगण्यावरून नारायण तीर्थाटनाला निघाला आणि नारायणाचे रामदास स्वामी झाले.
– श्री. चिंतामणी देशपांडे (मासिक धनुर्धारी, जुलै २०१२)