१. साधू-संत यांविषयी तिरस्कार असलेला सुभेदार जलालखान जयरामस्वामींच्या प्रवचनाच्या ठिकाणी जाणे
एकदा महाराष्ट्रातील मिरज येथील सुभेदार जलालखान फेरफटका मारत जयरामस्वामींच्या प्रवचनाच्या ठिकाणी पोहोचला. साधू-संत यांविषयी त्याच्या मनात तिरस्कार होता. तेथे आल्यावर त्याने विचार केला, पाहूया तरी हा काय बोलतो ते !
२. जो संतांच्या मार्गाने जातो, तो भगवंताची प्राप्ती करू शकतो, हे जयरामस्वामींचे वाक्य ऐकून जलालखानाने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवून श्रीरामाचे दर्शन घडवण्यास सांगणे
जयराम स्वामी सत्संगात बोलतांना म्हणाले, जो संतांच्या मार्गाने जातो, तो भगवंताची प्राप्ती करू शकतो. (जो संतांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करतो, तो भगवंताची प्राप्ती करू शकतो, असा या वचनाचा भावार्थ आहे.)
हे ऐकल्यावर जलालखानाच्या मनात जयरामस्वामींना कलंकित करण्याचा कट शिजला. दुसर्या दिवशी त्याने त्यांना बोलावून सांगितले, तुम्ही काल सत्संगात म्हणाला होतात, जो संतांच्या मार्गाने जातो, तो भगवंताची प्राप्ती करू शकतो. मी तुमच्या मार्गावर चालेन. मग तुम्ही तुमचा इष्टदेव श्रीराम याच्याशी माझी भेट घालून द्या आणि त्याचे दर्शन घडवा. जा व्यवस्था करा. उद्यापर्यंतचा अवधी देतो, नाहीतर समजून जा !
३. जयरामस्वामींनी समर्थ रामदासस्वामींचे साहाय्य मागणे
समजून जा,म्हणजे कडक शिक्षा मिळेल. जयरामस्वामी थोडे घाबरले. ते नदीकाठी गेले. तेथे समर्थ रामदासस्वामी स्नानाला आले होते. समर्थ रामदासस्वामी स्नान करून नदीतून बाहेर आल्यावर जयरामस्वामींनी त्यांना सर्व प्रसंग सांगितला. त्यावेळी त्या दोघांत पुढील संभाषण झाले.
समर्थ रामदासस्वामी (थोडे रागावून) : मी काय करणार ?अशा श्रद्धाभंजक आणि निंदक लोकांशी सावधगिरी बाळगून बोलले पाहिजे.
जयराम स्वामी : महाराज, आता या दांडगटाशी गाठ पडली आहे आणि यातून केवळ तुम्हीच मला वाचवू शकता.
समर्थ रामदासस्वामी : बरं ठीक आहे. जलालखानाला सांग की, सकाळी संत त्यांचा पूजा-पाठ,नियम इत्यादी करून निघतील. त्या वेळी तुम्ही त्यांच्या मागोमाग चला. आम्ही ज्या मार्गाने जाऊ, त्याच मार्गाने तुम्ही आलात, तरच तुमची श्रीरामाशी भेट करवून देऊ.
जलालखानाला तसा निरोप पाठवण्यात आला. खानाने विचार केला,कसे दर्शन घडवणार, तेच बघतो. नाही करवले, तर मग एकाचीच नव्हे, तर दोन्ही संतांची धडगत नाही.
४. समर्थ रामदासस्वामींनी खानाला त्यांच्या मागोमाग येण्यास सांगणे, लघिमा सिद्धीने समर्थांनी जयरामस्वामींना घेऊन सूक्ष्म-रूपाने किल्ल्याच्या अगदी लहान भोकातून किल्ल्यात प्रवेश करणे; परंतु जलालखानाला तसे जाता न येणे
जलालखान आला. समर्थांनी त्याला मागेमागे येण्यास सांगितले. सर्वजण चालत चालत मिरजेच्या किल्ल्याजवळ पोहोचले. किल्ल्याच्या आतून गोळीबार करण्यासाठी जी लहान लहान भोके असतात,त्यांच्यापैकी एका भोकाकडे पहात समर्थांनी लघिमा सिद्धीचा उपयोग केला. संकल्प करून समर्थ अगदी लहान झाले आणि त्या भोकातून किल्ल्यात गेले. ते जयराम स्वामींनाही संकल्पबळाने घेऊन गेले. मग समर्थ म्हणाले, जलालखान, ज्या मार्गाने आम्ही आलो आहोत, त्याच मार्गाने तुम्हीसुद्धा या. श्रीराम येथेच उभा आहे. या आम्ही तुम्हाला दाखवतो.
५. आधिदैविक आणि आध्यात्मिक सत्ताबळ असलेल्या संतांचे श्रेष्ठत्व खानाच्या लक्षात येऊन त्याने शरण जाऊन क्षमा मागणे
जलालखानाची मान लज्जेने खाली झुकली. देहबुद्धीत जगणारा, अहंकारी आणि आधिभौतिक बळालाच सर्वकाही मानणारा जलालखान त्या भोकातून कसा जाणार ? महापुरुषांकडे आधिदैविक आणि आध्यात्मिक सत्ताबळ असते. आधिभौतिकवाल्यांचे बळ तेथे काय करणार ! त्याने समर्थांची क्षमा मागितली आणि वचन दिले की, यापुढे मी कोणत्याही हिंदू साधूच्या सत्संगातील संत-वचनाचा उलटसुलट अर्थ लावून त्यांना त्रास देण्याचे दुःसाहस करणार नाही.
संदर्भ : ऋषीप्रसाद, फेब्रुवारी २०१२.