१. इंग्रजांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याला दिलेली अस्मिताहीन नावे पुसणारे सावरकर !
वर्ष १८५७ च्या भारतियांच्या स्वातंत्र्यलढ्याला इंग्रजांनी दिलेली शिपायांचे बंड, शिपायांची भाऊगर्दी ही सर्व नावे ठोकारून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे नाव प्रचलित केले. इंग्लंडमध्ये त्या शीर्षकाचा ग्रंथ त्यांनी वयाच्या पंचविशीत लिहिला.
२. ग्रंथाचे लिखाण आणि वितरण करण्यासाठी सावरकरांनी दाखवलेले चातुर्य !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाच्या लिखाणासाठी ब्रिटीश ग्रंथालय पालथे घालून संदर्भ धुंडाळले. त्यांचा संदर्भ शोधण्यामागचा हेतू लक्षात आल्यानंतर तेथील ग्रंथपालाने त्यांना ग्रंथालयात येण्यास प्रतिबंध केला; परंतु तोपर्यंत सावरकरांना कागदपत्रांची ठिकाणे माहीत झाली होती. त्यातून त्यांचा मराठीमधील ग्रंथ लिहून झाला. त्यांनी अल्पावधीतच या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करून ते हॉलंड आणि जर्मनी या देशांत छापले. नंतर ते ग्रंथ अंकल टॉम्स केबिन आणि पिकविक पेपर्स या तत्कालीन लोकप्रिय कादंब-यांची वेष्टने चढवून भारतात धाडले.
३. प्रकाशनपूर्व बंदी घातली गेलेला जगातील पहिला ग्रंथ !
इंग्रजांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथावर प्रकाशनापूर्वीच बंदी आणली. अशा प्रकारच्या बंदीचे हे जगातील पहिलेच उदाहरण होते. प्रकाशनापूर्वीच या पुस्तकात काय आहे, हे शासनाला कसे कळले, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज शासनाकडे विचारणा केली. त्यावर उत्तर मिळाले नाही; कारण बंदी घालण्यासाठी त्या ग्रंथाचे नावच पुरेसे बोलके होते.
४. क्रांतीकारकांची स्फूर्तीगीता
१८५७ चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ क्रांतीकारकांसाठी स्फूर्तीगीता ठरला. बाबाराव सावरकर यांनी या ग्रंथाचे भारतात वितरण केले. पुढे भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या ग्रंथाच्या आवृत्त्या प्रसिद्ध केल्या.
५. १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचे मराठीतील मूळ हस्तलिखित ४० वर्षे जिवापाड सांभाळणा-या डॉ. कुटिन्हो यांच्यामुळे तो ग्रंथ मराठीत प्रसिद्ध होऊ शकणे
१८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचे मराठीतील मूळ हस्तलिखित डॉ. कुटिन्हो नामक गोमंतकियाकडे होते. ते अभिनव भारत या संघटनेचे सदस्य होते. त्यांनी इंग्रजी ग्रंथावरील बंदीचे प्रकरण पाहून अमेरिकेला जातांना ते हस्तलिखित स्वतःसह नेले. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्याकडील ग्रंथाचे मूळ हस्तलिखित सावरकरांकडे पाठवले. अशा प्रकारे तो ग्रंथ वर्ष १९४९ मध्ये, म्हणजे ग्रंथाच्या लेखनानंतर चाळीस वर्षांनी प्रकाशित झाला. ही जगातील एकमेव घटना असेल !
– डॉ. सच्चिदानंद शेवडे (ग्रंथ निवडक मुक्तवेध)