श्री विघ्नेश्वराची कथा

फार प्राचीन काळी हैमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करीत होता. आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावे असे त्याला वाटू लागले. ही वार्ता स्वर्गातील इंद्राला नारदमुनींकडून समजली. तो घाबरला. त्याने अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाचे स्मरण केले. त्याच क्षणी अक्राळ-विक्राळ रूप धारण करून काळ प्रकट झाला. त्याला इंद्राने आज्ञा केली, 'अभिनंदनाच्या यज्ञात विघ्ने निर्माण कर, त्याच्या यज्ञाचा विध्वंस कर.' त्याने आज्ञा मिळताच अभिनंदनाच्या यज्ञाचा विध्वंस केला असे नव्हे, तर पृथ्वीवरील सर्वच वैदिक कर्मांचा नाश केला. धर्माचा लोप झाला. देवांवर हे मोठेच संकट आले. तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना केली. त्या वेळी गजानन पाराशर मुनींच्या आश्रमात राहत होता. देवांच्या आराधनेने गजानन प्रसन्न झाला. 'मी त्या विघ्नासुराचा बंदोबस्त करतो' असे त्याने देवांना आश्वासन दिले.

मग गजाननाने पाराशरपुत्र होऊन विघ्नासुराशी प्रचंड युद्ध केले. गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचे काही चालेना. तो शरण गेला. गजाननाने त्याला आज्ञा केली, 'ज्या ठिकाणी माझे भजन-पूजन-कीर्तन चालू असेल तेथे तू जाता कामा नये.' मग विघ्नासुराने गजाननाला वर मागितला, 'तुमच्या नावामागे माझे नाव असावे. 'विघ्नहर' किंवा 'विघ्नेश्वर' असे नाव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे.' तथास्तु' असे म्हणून गजानन म्हणाला, ''मी आजपासून 'विघ्नेश्वर' झालो आहे. मी तुला माझ्या गणसमुदायात घेतले आहे. 'विघ्नेश्वर' या नावाने जे कोणी जप करतील त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील.''

अशा प्रकारे विघ्नासुराचा पराभव केला; म्हणून गजाननास 'विघ्नेश्वर'' किंवा 'विघ्नहर' असे नाव या स्थानी प्राप्त झाले. मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्हकाळी देवांनी नैरुत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझर येथे घडली. हाच तो ओझरचा 'श्री विघ्नेश्वर विनायक' .

ओझर

श्री विघ्नेश्वर

श्री विघ्नेश्वर

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.